मुंबई : केईएम, शीव, नायर, कूपर यांसारखी महत्त्वाची रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहेत, त्यांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, किती रुग्णशय्या उपलब्ध आहेत, कोणत्या वैद्यकीय तपासण्या होतात, याची माहिती आता एका क्लिकवर रुग्णांना मिळणार आहे. त्यामुळे रुग्णालयात जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा आढावा घेता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बऱ्याचदा रुग्णशय्या उपलब्ध नसणे, आरोग्य सुविधा उपलब्ध नसणे, रक्त तपासण्या, औषधे उपलब्ध नसण्याच्या समस्येला रुग्णांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी रुग्णांनी उपचारासाठी येण्यापूर्वीच रुग्णालयात कोणत्या सुविधा, किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याची माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महानगपालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यात येणार आहे.
यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ऑनलाईन पोर्टल, डॅशबोर्ड व चॅटबॉट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅटबॉटच्या माध्यमातून जवळपास कोणते वैद्यकीय महाविद्यालय आहे, कोणते उपनगरीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र कोणते असणार आहे, याबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पोर्टल व डॅशबोर्डवर रुग्णांना रुग्णालयातील रुग्णशय्यापासून उपलब्ध असलेल्या रक्त तपासण्या, रक्त साठा आदी सर्व सुविधांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना नाेंदणीदरम्यान लागणाऱ्या लांबच लांब रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोकन पद्धती सुरू करण्यात येणार आहे. कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोर्टल व डॅशबोर्डमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर करणार उपलब्ध
रुग्णालयातील आरोग्य सुविधांसंदर्भातील माहिती रुग्णांना माहित व्हावी यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या पोर्टलची मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना या संकेतस्थळावरून पोर्टलवर जाणे सोपे होणार आहे.
करोनामध्ये केला होता प्रयोग
करोनामध्ये रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र डॅशबोर्ड तयार केला होता. त्याला करोना रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासही मदत झाली. मात्र त्यात बऱ्याचदा स्थानिक नगरसेवकांकडून हस्तक्षेप करण्यात येत असल्याच्या तक्रारीही पुढील काळात वाढल्या. त्यामुळे रुग्णालयातील सुविधांबाबत बनविण्यात येणाऱ्या डॅशबोर्डवर स्थानिक नगरसेवक व आमदारांचा हस्तक्षेप कसा होणार नाही याकडे मुंबई महानगरपालिकेला लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे.
कोणती माहिती असणार डॅशबोर्डवर
रुग्णालयामध्ये असलेल्या उपलब्ध व रिक्त रुग्णशय्यांचा तपशील, रक्त तपासण्या, आरोग्य सुविधा, औषधांची उपलब्धता, रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची वेळ काय आहे, त्या रुग्णालयामध्ये कोणत्या सुविधा आहेत याची माहिती नागरिकांना मिळणार आहे.