मुंबई : हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरामध्ये बुधवारी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला होता. मात्र मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली नव्हती. त्यामुळे अनेक पालकांनी भीतीपोटी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवले नाही. मुंबईतील शाळा बुधवारी भरल्या, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच तुरळक हाेती. त्यामुळे सकाळच्या सत्रातील अनेक शाळा अर्धा दिवस भरवल्या होत्या.
मुंबईमध्ये सोमवारी कोसळलेल्या मुसळधारांमुळे अनेक विद्यार्थी शाळांमध्ये, तसेच रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यात अडकले होती. त्यातच हवामान खात्याने मंगळवारप्रमाणे बुधवारीही मुंबईमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर केला. मात्र मुंबई महानगरपालिकेने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना फक्त मंगळवारी सुटी जाहीर केली मात्र बुधवारी सुटी जाहीर केली नाही. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
त्यातच मंगळवारी रात्री काही शाळा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन पालकांनी स्वत:च्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे असा संदेश पालकांना पाठविला होता. त्यातच बुधवारी सकाळी पाऊस पडू लागताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना घरी आणताना पालकांची पुरती वाट लागली होती. अनेक पालकांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत पाल्यांना घरी आणले होते. तर अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने शालेय बसही अडकल्या होत्या.
त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास विलंब झाला होता. बुधवारी सकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. परिणामी बुधवारी सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती. त्यामुळे मुंबईतील अनेक शाळा प्रशासनाने सकाळच्या सत्रातील शाळा अर्धा दिवस सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच अनेक शाळा प्रशासनांनी शिशू वर्गाला सुटी जाहीर केली होती.
दुपारच्या सत्रातील शाळा सुरळीत
मुंबईमध्ये पावसाने बुधवारी सकाळी ९ वाजल्यानंतर चांगलीच उघडीप घेतली होती. सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थांची उपस्थिती कमी असली तरी दुपारच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. त्यामुळे दुपारच्या सत्रातील वर्ग नियमितपणे झाले.