मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राम मंदिर स्थानकात मंगळवारी मध्यरात्री अभियंता असलेल्या प्रवाशाने महिला डाॅक्टरच्या मदतीने महिलेची प्रसूती केली. दोघांनी प्रसंगावधान राखत महिला आणि तिच्या बाळाचे प्राण वाचविले.
मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास धावत्या लोकलमध्ये गरोदर महिलेला प्रसूती वेदना असह्य होऊ लागल्या. ती महिला मदतीसाठी धावा करीत असल्याचे पाहून लोकलमधील सहप्रवासी विकास बेद्रे यांनी ताबडतोब लोकलची आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर राम मंदिर स्थानकाजवळ लोकल थांबली. महिलेला लोकलमधून खाली उतरवून, फलाटावरील टेबलवर झोपवले. तसेच रेल्वे स्थानकातील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
काही प्रवाशांनी रुग्णवाहिका व डाॅक्टरची मदत मिळवण्यासाठी संपर्क साधला. परंतु, बराच वेळ मदत मिळत नसल्याने विकास बेद्रे यांनी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टर देविका देशमुख यांच्याशी मध्यरात्री १.३० च्या सुमारास संपर्क साधला. डॉक्टर देविका यांना तत्काळ राम मंदिर येथे येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी व्हिडीओ काॅलवरून मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विकास यांनी महिलेला मदत केली.
प्रसुतीच्या वेळी विकास यांनी फलाटावरील चहाच्या टपरीवरून कात्री आणली. तसेच प्रसूतीची तयारी करण्यासाठी विकास यांनी काही चादरीही गोळा केल्या होत्या. त्यानंतर या महिलेने एका बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी विकास बेद्रे यांचा सत्कार केला.
गोरेगाव पूर्व येथील रहिवासी विकास बेद्रे हे मंगळवारी रात्री अहमदाबाद येथे जात होते. मुंबई विमानतळावरून पहाटे ४ वाजता विमानाने ते जाणार होते. विमानतळावर जाण्यासाठी त्यांनी गोरेगाव येथून रात्री १२.४० ची चर्चगेट लोकल पकडली होती.