मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील विद्युत शिवनेरीचे मोटर नट पडल्यामुळे बसची मोटर पडली आणि चाक वाकडे झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. परंतु, बसचे चाक निखळले असते, तर मोठा अपघात घडला असता. थोडक्यात, मोठी दुर्घटना टळली. या घटनेतून बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुणे येथून सोमवारी सकाळी साडेदहा वाजता बस निघाली. ही बस वाशी खाडी पुलाकडे जात असताना बसच्या मोटरचे नट पडल्यामुळे बसची मोटर देखील पडली आणि चाक वाकडे झाले. यावेळी बसमध्ये ३९ प्रवासी होते. या घटनेमुळे भयभीत प्रवासी बसबाहेर आले. बसचे वाकडे झालेले चाक पाहून प्रवासी आणखी घाबरून गेले. अनेक प्रवाशांनी चालकाला दोष देऊन, संताप व्यक्त केला. पैसे घेऊन जीवघेणी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाविषयी राग व्यक्त केला.

पुणे ते दादर जाणारी ही विद्युत शिवनेरी बस बंद पडल्याने, पर्यायी बस अर्धा ते पाऊण तास आली नाही. त्यामुळे, बहुतांश प्रवाशांनी आधी वाशी, नंतर कुर्लामार्गे दादर रेल्वे स्थानक गाठले. आठवड्याचा पहिला वार असल्याने अनेकांची कार्यालयीन कामे रखडली. दरम्यान, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. सर्व प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आले, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

महिलांना अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास देण्यात आला. परंतु, हा प्रवास भयानक अनुभव देणारा ठरला. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील विद्युत शिवनेरीची देखभाल-दुरुस्ती होत नसल्यास, इतर बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. राज्य सरकारने पूर्ण पैसे घेऊन सुरक्षित प्रवास द्यावा, अशी प्रतिक्रिया बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेने दिली.