मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागातील इमारतीचा वीजपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते ११.३० दरम्यान खंडित झाला होता. या इमारतीमध्ये फक्त बाह्यरुग्ण विभाग असल्याने रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र क्ष किरण व डीटीपीए विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना नाहक त्रासाला सामाेरे जावे लागले. तब्बल अडीच तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक उकाड्याने हैराण झाले होते.
टाटा रुग्णालयाच्या समोर केईएम रुग्णालयाची अस्थिव्यंग विभागाची स्वतंत्र इमारत आहे. या इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग, डीटीपीए व क्ष किरण विभाग आहेत. बेस्टकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ९ वाजता अचनाक वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. सकाळी ११.३० च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. या कालावधीमध्ये बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना फारसा त्रास झाला नसला तरी या इमारतीमध्ये असलेले क्ष किरण विभाग व डीटीपीए तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना तब्बल अडीच तास ताटकळत थांबावे लागले.
क्ष किरण काढणे व त्याचा अहवाल मिळण्यात अडचणी येत असल्याने काही रुग्णांनी थांबणे पसंत केले. तर अनेकांनी बराच वेळ वाट पाहून नंतर येण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे डीटीपीए तपासणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना एक ते दीड महिन्यांनी तारीख मिळत असल्याने सकाळी ९ ते ११.३० च्या दरम्यान तपासणीसाठीची वेळ दिलेल्या रुग्णांना अन्न व पाण्यावाचून दुपारपर्यंत थांबावे लागले.
अस्थिव्यंग विभागातील वीजपुरवठा दीड ते दोन तास खंडित होता. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त केला. त्यामुळे रुग्णांना फारसा त्रास झाला नसल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली.