मुंबई : औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीनंतर तब्बल २४ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या फेरीसाठी २० जार ३६३ जागा रिक्त आहेत.
भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडून (पीसीआय) महाविद्यालयांना मान्यता देण्यास झालेला विलंब, पायाभूत सुविधा नसल्याने पदवीच्या १८ महाविद्यालयांवर प्रथम वर्षाच्या प्रवेशावर घातलेली बंदी अशा अनेक अडचणीनंतर सुरू झालेली औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेशासाठी ४४ हजार २८७ जागांसाठी राज्यभरातून ५५ हजार ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ३८ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला होता. पहिल्या फेरीमध्ये १६ हजार ६७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तसेच नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये ८ हजार १३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून २४ हजार ८०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी २० हजार ३६३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची तिसरी फेरी सुरू झाली असून, २४ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. निवड यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २८ ते ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर चौथ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
चौथी प्रवेश फेरी १ ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार असून, संस्थात्मक फेरी ११ ते १७ नाेव्हेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.