मुंबई : उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल हे मंगळवारी सकाळी बोरिवलीतील गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गोयल यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला असून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा घोळ सुरूच आहे. कोणी उमेदवार देता का उमेदवार, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातील प्रथेप्रमाणे गोयल यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बोरिवली ते कांदिवली अशा भव्य प्रचारफेरी आणि रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष आदी सहभागी झाले होते.

गोयल यांनी पहिल्या टप्प्यात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. गोयल यांनी मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या दहिसर, मागाठणे, बोरिवली, चारकोप, कांदिवली, मालाड या सहाही विधानसभा मतदारसंघांतील सर्व थरांतील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातील फेरीवाले तसेच सर्वसामान्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्याचबरोबर युवा, महिला, चाळीतील रहिवासी अशा वेगवेगळ्या स्तरांतील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.

हेही वाचा >>>मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका तिकीट दलालाला पकडले, ३८ हजार रुपयांची १४ इ-तिकिटे ताब्यात

गोयल यांनी व्यापारी, व्यावसायिक, उद्याोजक यांच्या भेटी घेत सरकारचे धोरण, वेगवेगळ्या क्षेत्रांतील नव्या संधी आणि नव्या योजना याबाबत विचारविनिमयही केला आहे. कच्छ युवा संघ, बंगाली समाज, उत्तर भारतीय तसेच सर्व सामाजिक संस्था, संघटनांशी संवाद साधला. बोरिवली ते मालाड असा लोकल प्रवास करताना त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दमानी फाऊंडेशनचे सहाशे खाटांचे रुग्णालय

उत्तर मुंबईत उत्तम वैद्याकीय सुविधा देणारे रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन गोयल यांनी नुकतेच केले होते. त्याला प्रतिसाद देत सहाशे खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा दमानी फाऊंडेशनने सोमवारी गोयल यांच्या उपस्थितीत केली. परिचारिका आणि निमवैद्याकीय कर्मचारी प्रशिक्षण सुविधाही उपलब्ध करण्याची सूचनाही गोयल यांनी व्यवस्थापनास या वेळी केली. या कार्यक्रमास वैद्याकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.