मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त राज्य सरकार, भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमधून मोठ्या प्रमाणात रक्त संकलित झाले असले तरी राज्यातील १६० ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांपैकी ११६ ठिकाणी एकाही दात्याने रक्तदान केले नाही तर २३ ठिकाणी रक्तदात्यांची दोन आकडी संख्या गाठणेही मुश्किल झाले आहे.

राज्यामध्ये स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव व त्यानंतर नवरात्रोत्सवात विविध मंडळे, सामाजिक व धार्मिक संघटना यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचबरोबर भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांकडूनही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित सुमारे १६० रक्तदान शिबिरांसाठी रक्तदाते जमा करताना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. यापैकी ११६ शिबिरांना एकाही रक्तदात्याने हजेरी लावली नाही. बीडमध्ये सर्वाधिक १४ रक्तदान शिबिरांमध्ये शून्य रक्तदान झाले. त्याखालोखाल मुंबईमध्ये १२, पुण्यामध्ये ९ रक्तदान शिबिरांना एकाही रक्तदात्याने हजेरी लावली नाही. तसेच राज्यातील २३ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच रक्तदात्यांनी हजेरी लावली होती.

राज्यामध्ये स्वातंत्र्यदिनापासून विविध रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन होते. मात्र रक्तदान करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. तसेच एकदा रक्तदान केल्यानंतर तीन महिने रक्तदान करता येत नाही. परिणामी, सेवा पंधरवड्यामध्ये आयोजित रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांकडून अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

शून्य रक्तदान झालेले शिबीर

राज्यामध्ये ११६ ठिकाणी शिबिरांना रक्तदाते मिळाले नसून त्यामध्ये बीडमध्ये १४ ठिकाणी एकही रक्तदाता उपस्थित राहिला नाही. त्याखालोखाल मुंबई १२, पुणे ९, अमरावती, नाशिक, जालना, यवतमाळमध्ये प्रत्येकी ८, ठाणे, अहमदनगर ७, नागपूर, वर्ध्यामध्ये प्रत्येकी ६, रायगड, बुलढाणा, नंदुरबारमध्ये प्रत्येकी ३, पालघर, सांगली, धुळे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी २, अकोला, रत्नागिरी, गोंदिया, कोल्हापूर, सातारा, सोलापूर प्रत्येकी एका रक्तदान शिबिराला शून्य रक्तदाता उपस्थित होते.

मुंबईमध्ये मेगा रक्तदान शिबिरांकडेही पाठ

मुंबईमध्ये बीकेसी, चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर, हाजी अली, कुर्ला येथे झालेल्या रक्तदान शिबिराला एकही रक्तदाता उपस्थित नव्हता. तसेच मुंबईतील बीकेसी, घाटकोपर, राणी सती मार्ग येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करूनही त्याला रक्तदाते उपस्थित राहिले नाही.