मुंबई : मुंबईत जोरदार पाऊस पडल्याने लोकल सेवा कोलमडून जाते. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन लोकल सेवा ठप्प होते. यात रेल्वेच्या पॉईंटमधील बिघाड लोकल विस्कळीत होण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बिघाड कमी करण्यासाठी जलरोधक यंत्रणा पॉईंटच्या ठिकाणी बसवली जात आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचून, पॉईंट बिघडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे भायखळा येथील सिग्नल आणि दूरसंचार दुरुस्ती विभागाने मुसळधार पावसात होणारे पॉईंट बिघाड कमी करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. जोरदार पावसात आणि पुराच्यावेळी पॉईंट बिघाड होऊ नये, यासाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून पॉईंटजवळ जलरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून २५ पॉईंट यंत्रणेला जलरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या अन्य पॉईंटवर ही यंत्रणा बसवली जाणार आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पॉईंट मशीनचे आवरणदेखील मजबूत करण्यात आले आहे. त्यामुळे हवा आणि पाण्याला आत जाण्यास प्रतिबंधित करेल. त्यामुळे लोकल सेवा सुरळीत चालू राहील, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – मेट्रो ४ आणि ५ मार्गिकेच्या कारशेडच्या जागेची प्रतीक्षा

हेही वाचा – “भेटणं कधीही चांगलं, तुम्ही गुपचूप…”, अमृता फडणवीसांचं शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर सूचक विधान!

सीएसएमटी ते कल्याण एकूण ४३१ पॉईंट

सीएसएमटी ते पनवेल एकूण १३८ पॉईंट