मुंबई : चेंबूर (पूर्व) परिसरातील वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करीत ३३ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १.५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ४, ५ आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ सह कलम ६५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम २०१९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी कक्ष ८ कडे वर्ग करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या धारे कक्ष – ८ मधील अधिकारी व अंमलदारांनी वसंतविहार कमर्शियल कॉम्प्लेक्समधील जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १ जुगार अड्डा चालक, १ कॅशिअर, पैज लावणारे ७ जण व जुगार खेळणारे २४ जण अशा एकूण ३३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच जुगाराच्या अड्यावरून दीड लाख रुपयांची रोख रक्कम, ३ कोटी ३० लाख १ हजार ४०० रुपयांचे जुगाराचे साहित्य, आर्थिक व्यवहाराकरीता ठेवलेले ५ हजार रुपयांचे पीओएस मशीन आणि १० हजार रुपयांची विदेशी दारू असा एकूण ३ कोटी ३१ लाख ६६ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कक्ष-८ चे सह पोलीस निरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत.