मुंबई : तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीला शिवीगाळ करून तिच्यावर गणवेशावरील नेमप्लेट फेकून मारणाऱ्या पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाने नोटीस पाठवली आहे. तर इव्हेंट कंपनीच्या कार्यालायत जाऊन धुडगूस घातल्याप्रकरणी यश कारंडे या तरुणाविरोधा व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईच्या व्ही.पी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेेलेल्या तरुणांना पोलिसांनीच शिवीगाळ केल्याची आणि अरेरावी करून हिन वागणूक दिल्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे आपल्या गणवेशावरील धातूची नेमप्लेट एका तरुणीला फेकून मारत असल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. पोलीस आमची तक्रार दाखल करून न घेता आम्हालाच दमदाटी करीत असल्याचा आरोप यश कारंडे या तरूणाने चित्रफितीत केला आहे. ही चित्रफित समाजमाध्यमावर चांगलीच व्हायर झाल्यानंतर पोलिसांच्या कृतीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मानवाधिकार आयोगाची पोलिसांना नाोटीस

राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्तांना ६ आठवड्यात या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नेमप्लेट भिरकावणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांना मानवाधिकार आयोगापुढे हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांनी हे समन्स बजावले आहे.

तरुणाविरोधातही गुन्हा

पोलिसांच्या या कृत्याविरोधात समाजमाध्यमावर टीका होत आहे. दुसरीकडे पोलिसांनीही आपल्या बचावासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण करणारा आणि पोलिसांवर अरेरावीचा आरोप करणारा तरूण यश कारंडे हा आपल्यावरील गुन्हा लपविण्यासाठी पोलिसांवर आरोप करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यश कारंडे आणि त्याचा मित्र जयेश सोनार एका इव्हेंट कंपनीत काम करतात. कंपनीचा व्यवस्थापक लोकेंद्र राव यांनी त्यांचे काही पैसे थकविल्याने त्यांच्यात वाद झाला होता. यश करांडे आणि त्याचा मित्र जयेश कुमार सोनार यांनी १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी राव यांच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून जबरदस्ती आत प्रवेश केला. राव यांचे मित्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच यशने त्यांनाही शिवीगाळ केल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात दिसत आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर यश आणि त्याच्या मैत्रीणीने पोलीस आमची तक्रार घेत नाहीत, असा आरोप करत गोंधळ घातला आणि मोबाइलवर चित्रिकरणकरून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित पोलिसांनी मात्र दुसऱ्या तक्रारदाराचे जबाब नोंदवले जात असल्याचे सांगून थोडी प्रतीक्षा करण्यास सांगितले होते. तरीही यश व त्याची मैत्रीण गैरवर्तन करीत राहिले, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी व्ही.पी. मार्ग पोलिसांनी इव्हेंट कंपनीचा व्यवस्थापक लोकेंद्र राव याच्या तक्रारीवरून यशविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२९(४), ३२४(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राव यांच्या तक्रारीत काय आरोप ?

या प्रकरणी लोकेन्द्र राव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. राव यांना गोरेगाव येथील एका कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचे काम मिळाले होते. कार्यक्रम आयोजकांनी कर्मचाऱ्यंनी पाहुण्यांसाठी ठेवलेले जेवण करू नये, अशी स्पष्ट सूचना दिली होती. मात्र यश करांडे, रुची पाल व इतरांनी जेवण केले. यामुळे आयोजकांनी राव यांना जाब विचारला. यावरून वाद निर्माण झाला होता, असे राव यांनी तक्रारीत म्हटले आहे.