मुंबई : अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलाला मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असताना सातरस्ता परिसरात १२ वर्षांच्या मुलीचा पाठलाग करून तिला उद्वाहनात जाण्यापासून रोखण्यासाठी तिचा हात पकडल्याचा प्रकार घडला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी पोलीस शिपाई असून त्याला याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. या सर्व प्रकाराचे इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झाले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बारा वर्षांची मुलगी आग्रीपाडा परिसरात राहते. ती शनिवारी इमारतीखाली प्रसाद आणण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपीने तिला पाठलाग केला. तसेच पीडित मुलीने उद्वाहनात जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला अडवले व तिचा हात पकडला. त्यानंतर तिला जबरदस्तीने तळ मजल्यावरून पायऱ्यांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला असता तिने याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे तक्रार केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८ व पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस शिपाई पदावर ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून तो आरोपीविरोधात महत्त्वाचा पुरावा असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याच्या प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचीत व्यक्त आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते.