मुंबई : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ सुरू आहे. गत दोन महिन्यांपासून या हॅकेथॉनची तयारी सुरू आहे. पण, हॅकेथॉनचे नियोजन ढिसाळ झाल्याचे समोर आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तयार केलेल्या प्रकल्पांचेच (प्रोजेक्ट) सादरीकरण केले आहे. राज्याबाहेरील, देशाबाहेरील सहभागींची संख्याही अत्यल्प आहे. सादर केलेले प्रकल्पही अत्यंत प्राथमिक पातळीवरील आहेत.
कृषी विभागाच्या पुढाकाराने पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय पुणे ॲग्री हॅकेथॉन सुरू आहे. त्याची तयारी पाच एप्रिलपासून तयारी सुरू आहे. तीन दिवसीय हॅकेथॉनचा आज, मंगळवारी समारोप होणार असून, केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. विभागाकडून मोठा गाजावाजा सुरू असला तरीही, प्रत्यक्षात ढिसाळ नियोजन समोर आले आहे.
सहभागींमध्ये कृषी, अभियांत्रिकी, संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थींकडून नव्या संकल्पना, प्रकल्पांचे सादरीकरण होणे अपेक्षित असले तरीही विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून महाविद्यालयात सादर केलेल्या प्रकल्पांचेच (प्रोजेक्ट) सादरीकरण हॅकेथॉनमध्ये केले आहे. शिवाय ते सादरीकरण अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. हॅकेथॉनसाठी सादरीकरणांची निवड करण्याची प्रक्रियेतही ढिसाळपणा दिसून आला आहे.
छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, छत्रपती संभाजीनगर यांची सात सादरीकरणे, एन. के. ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, सोलापूर यांची चार सादरीकरणे, संजिवनी युनिव्हर्सिटी अहिल्यानगर. एम. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड यांची प्रत्येकी दोन सादरीकरणे, अण्णासाहेब मगर महाविद्याल, हडप्पसर, चेन्नई इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, एमआयटी- एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे. चंदीगड युनिव्हर्सिटी, चंदीगड, आयसीआर- सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग, भोपळ यांचे प्रत्येकी एक सादरीकरणाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा वेगळा गट निर्माण करण्याची गरज होती.
पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील निरीक्षणे
– विद्यार्थ्यांची सादरीकरणे अत्यंत प्राथमिक अवस्थेतील. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तयार केलेल्या सादरीकरणांची मांडणी.
– माती परीक्षण, ठिबक सिंचन, हवामान आधारीत कीड-रोग व्यवस्थापन, ऑनलाईन रोजगार, अवजारे बँक ॲपच्या सादरीकरणात नविन्याचा अभाव.
– रविवारी उद्घाटन झाल्यानंतर अनेक स्टॉल मोकळे.
– परीक्षकांकडून परीक्षण झाल्यानंतर अनेकांनी गाशा गुंडाळला.
– राज्याबाहेरील, देशाबाहेरील सादरीकरणे अपवादात्मक.
– सादरीकरणांना आर्थिक मदत देऊन व्यावसायिक वापर होण्यासाठी आर्थिक गुंतवणूकदारांची वानवा.
– काही कंपन्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचे सादरीकरण केल्यामुळे हॅकेथॉनच्या मूळ उद्देशालाच हारताळ फासला गेला.
कृषी विभागाचे मनुष्यबळ, खर्च वाया ?
हॅकेथॉनच्या तयारीसाठी कृषी विभाग एप्रिल महिन्यापासून कार्यरत आहे. खरीप हंगाम तोंडावर असतानाही पुणे जिल्ह्याचा कृषी विभाग आणि काही अधिकारी हॅकेथॉनच्या तयारीत मग्न होते. तीन दिवस चालणाऱ्या हॅकेथॉनसाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक केली आहे. एकूण आठ विभागात झालेल्या सादरीकरणांसाठी पहिल्या आठ क्रमांकांना प्रत्येक २५ आणि दुसऱ्या क्रमांकावरील आठ सादरीकरणांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. एकूण सादरीकरणे आणि कार्यक्रमाचे आयोजन, स्टॉल, परीक्षकांचे मानधन आदींचा विचार करता कृषी विभागाचे मनुष्यबळ आणि खर्च वाया गेल्याचे दिसून आले आहे.
पुढील हॅकेथॉनमध्ये सर्व त्रुटी दूर करू
देशातील हे पहिलेच ॲग्री हॅकेथॉन आहे. त्यामुळे नियोजनात काही त्रुटी राहिल्या असतील. पण, पुढील हॅकेथॉनमध्ये सर्व त्रुटी दूर केल्या जातील. दरवर्षी हॅकेथॉनचे आयोजन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञानाचा शोध घेऊन, त्यांना आर्थिक, तांत्रिक मदत उपलब्ध करून देऊन संबंधित तंत्रज्ञानाची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. सुमारे दहा हजार जणांनी हॅकेथॉनला भेट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही काही नाविन्यपूर्ण गोष्टी करीत आहोत, त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केले.