फेसबुकवरून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकुराच्या घटनेनंतर पुण्यातील हडपसर भागामध्ये एका टोळक्याने मोहसीन शेख या आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्र सरकारनं राज्य सरकारचा अहवाल फेटाळल्यानंतर, आता राज्य सरकार नव्यानं कामाला लागलं आहे. दरम्यान, मोहसीन शेख हा पूर्णपणे निर्दोष असल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं असून राज्यात पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यापुढे फेसबुक- व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास आणि तो मजकूर लाईक केल्यासही गुन्हा ठरेल असंही पाटील म्हणाले.
या प्रकरणी पोलिसांनी नुकतीच प्रतिक पंडित सागले (२०) आणि प्रसाद बाळासाहेब पानसरे (२२) या दोघांना भेक्रेनगर, फुरसुंगी येथून अटक केली आहे. यापूर्वी हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. या संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी पुण्याला भेट दिली होती. दरम्यान, हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याच्या शक्यताही राज्य सरकार तपासून पाहत आहे.