मुंबई : कस्तुरबा रुग्णालयातील निवृत्त कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांनी रुग्णालयात प्रबोधकारांचे पुस्तक वाटल्याने निर्माण झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कदम यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. मनसेने मात्र प्रबोधकारांचे पुस्तक फेकून अपमान करणार्या परिचारिकांवर कारवाईची मागणी केली आहे. ‘लोकसत्ता’ने रविवारी हे प्रकरण समोर आणले होते.

प्रकरण काय?

राजेंद्र कदम (५८) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणूून कार्यरत होते. ते ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी आपल्या सहकार्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘देव आणि देवळांचा धर्म’ तसेच दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकांचे वाटप केले होते. या पुस्तकांमुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत महिलांना कदम यांना असे पुस्तक का वाटले? म्हणून जाब विचारला. कदम यांनी माफी मागितल्यानंतरही त्यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे पुस्तक फेकून मारले आणि त्या घटनेची चित्रफित समाजमाध्यमवार व्हायरल केली. याप्रकरणी रुग्णालयाने परिचारिकांवर ठोस कारवाई न करता नोटीस बजावली होती. त्यामुळे कदम यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी परिचारिकांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. लोकसत्ताने ५ ऑक्टोबर रोजी या संदर्भातील वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमावर उमटल्या किशोरी पेडणेकर कदम यांच्यावर बरसल्यामंगळवारी माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किरोशी पेडणकर यांनी कस्तुरबा रुग्णालयला भेट देत परिचारिकांच्या बाजूने उतरल्या. प्रबोधनकारांचे पुस्तक स्वातंत्र्यापूर्वीचे आहे. ते जहाल आहे.

मग आता वाटण्याचे कारण काय? असा सवाल केला. दिनकरराव जवळकर यांचे देशाचे दुश्मन या पुस्तकावर बंदी असल्याचा दावा केला. अशी पुस्तक वाटून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा कदम यांचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी केला. कदम यांच्या मागे कोण आहे त्याचा शोध घ्या, या प्रकरणाची सखोल चौकशी करा अशी मागणी केली. आमदार मंगेश जामतुसतकर यांनीही कदम यांच्यावर टिका केली.

मनसेची परिचारिकांवर कारवाईची मागणी

मनसेने मात्र प्रबोधनकार ठाकरे यांचा अवमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मंगळवारी मनसेच्या पदाधिकार्यांनी कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाची भेट घेली. या चित्रफितीमध्ये महिला प्रबोधनकार ठाकरे यांचा अवमान करत असताना दिसून येत आहेत. त्या महिलांवर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळातील पदाधिकारी उत्तम सांडव यांनी केली. बृहनमुंबई महानगरपालिका एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशने यापूर्वीच पालिका आयु्क्तांना पत्र लिहून कदम यांना न्याय देण्याची तसेच संबंधित परिचारिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.