मुंबई : महाबळेश्वर, माथेरान, मिठबाव, हरिहरेश्वर आणि ताडोबा या पाच पर्यटनस्थळांवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीवर खासगीकरणाच्या माध्यमातून रिसॉर्ट बांधण्यासाठी पर्यटन विभागाने गुरुवारी विकासकांसह करार केला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे करार झाले. 

कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वलसा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 पर्यटन धोरणांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तसेच राज्यात पर्यटन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आणि विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास शासनाने राज्यात अनेक शासकीय जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे असलेल्या मोकळय़ा जमिनी तसेच विकसित केलेल्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देऊन पर्यटन क्षेत्रात खासगी भागीदारी वाढविण्यासाठी आणि राज्यातील पर्यटन स्थळांचा जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२० रोजी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केला. या धोरणानुसार महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा/ मालमत्तांचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्टय़ा विकास करण्यासाठी जमीन भाडेपट्टा / भागीदारी  आणि व्यवस्थापन आदी उपलब्ध पर्यायांचा विचार करून निर्णय घेण्याकरीता प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागाराने दिलेल्या अहवालावर प्रत्येक पर्यटन स्थळासाठी योग्य पर्यायाची निवड करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र विकासकांची नियुक्ती झाली आहे. महाबळेश्वरसाठी टी एन्ड टी इन्फ्रा, माथेरानसाठी ऱ्हिदम हॉस्पिटॅलिटी, हरिहरेश्वरसाठी मिहद्रा हॉलिडेज, मिठबावसाठी रिसॉर्ट हब टाऊन आणि ताडोबासाठी द लीला /ब्रूकफिल्ड यांच्यासमवेत करार करण्यात आला आहे.