मुंबई : कर्करुग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या टाटा रुग्णालयातील औषध विक्री केंद्राचे खासगीकरण करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. रुग्णालयातील औषध विक्री केंद्र बंद करण्यात येणार असून औषध विक्रीसाठी ‘टाटा वन एमजी’ या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय खासगीकरणानंतर रुग्णांना कशा प्रकारे औषधे मिळणार याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही.

कर्कग्रस्त रुग्णांना चांगले उपचार मिळावेत आणि त्यांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयातच औषध विक्री केंद्र सुरू केले आहे. या औषध विक्री केंद्रात रुग्णांना सर्व औषधे सवलतीच्या दरात, तसेच स्वस्त मिळत आहेत.मात्र आता हे औषध विक्री केंद्र खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय टाटा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तसेच हे औषध विक्री केंद्र चालविण्यााठी ‘एफडीए’ने या खासगी कंपनीला परवानगी दिली आहे. या केंद्रातून रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये मिळणारी औषधेही स्वस्तात मिळण्याची शक्यता कमी आहे. टाटा वन एमजी कंपनीला औषध विक्री केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कंपनीला केंद्र दिल्यानंतरही रुग्णांना पूर्वीप्रमाणे सवलतीच्या दरात औषधे मिळणार आहेत.

तसेच टाटा रुग्णालयामध्ये अनेक पदे निर्माण होत आहेत. औषध विक्री केंद्रातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना या पदांवर सामावून घेण्यात येणार असल्याचे टाटा कर्करोग रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बनवली यांनी सांगितले.

‘चांगली सेवा’

औषध विक्री केंद्रातील औषधे ठेवण्यासाठी टाटा रुग्णालयाकडे पुरेशी जागा नाही. या कंपनीला कंत्राट दिल्याने औषधांचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. तसेच एखादे औषध केंद्रामध्ये संपल्यास कंपनी त्यांच्या गोदामातून तातडीने ते रुग्णाला उपलब्ध करून देऊ शकते. तसेच त्यांना बाहेरील औषधांच्या दुकानातून औषध खरेदी करण्याची गरज पडणार नाही. या निर्णयाने रुग्णांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास टाटा रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बनवली यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा वन एमजी या खासगी कंपनीला कंत्राट देताना निविदा प्रक्रियेतील अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच या कंपनीला औषध केंद्र चालविण्यास दिल्यानंतर तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोकरी अबाधित राहणार का? तसेच रुग्णांना पूर्वीप्रमाणेच सवलतीच्या दरामध्ये औषध मिळणार का, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन