मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील पाली विभाग अनुदानित करावा आणि सदर विभागासाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणारे संशोधक विद्यार्थी भंते विमांसा (राजेश जनार्दन बलखंडे) यांच्या समर्थनार्थ विविध समविचारी संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी कलिना संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्याचीही मागणी केली. यामुळे कलिना संकुलात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

गेल्या एक महिन्यापासून विविध मागण्यांसाठी मराठी विभागातील पीएच.डी.चे विद्यार्थी भंते विमांसा आंदोलन करीत आहेत. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात १५ सप्टेंबर रोजी वारसा भाषा आणि बहु-सांस्कृतिक अभ्यास उत्कृष्टता केंद्राच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य व संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू आले होते. तेव्हा विविध मागण्यांचे पत्र किरेन रिजिजू यांना देत असताना भंते विमांसा यांना अडविण्यात आले आणि मारहाण केली गेली. तसेच त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप समर्थकांनी केला आहे. यामुळे भंते विमांसा यांची प्रकृती खालावली व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने भंते विमांसा यांच्यावर अन्याय केला आहे, असा आरोपही आंदोलकांनी केला.

‘पीएच.डी.चे अल्पसंख्यांक विद्यार्थी भंते विमांसा यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यालयाकडून किरेन रिजिजू यांना भेटण्याची रितसर परवानगी घेतली होती. मात्र मुंबई विद्यापीठ प्रशासनाने अडथळा आणून भेटू दिले नाही. हे करताना सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम व ‘यूजीसी’च्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले दिसते’, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे म्हणणे काय ?

भंते विमांसा यांना मारहाण झाल्याचे वृत्त खोटे असून दिशाभूल करणारे आहे. त्यांनी संरक्षक भिंतीवरून उडी मारली आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर ते आडवे झोपले. तेव्हा सुरक्षा अधिकारी बाळासाहेब खरात यांनी त्यांना बाजूला होण्याची विनंती केली, मात्र त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांच्याच पोटात लाथ मारली. तत्पूर्वी भंते विमांसा यांच्यासोबत विविध बैठका आयोजित करण्यात आल्या, मात्र त्यांनी बैठकीस उपस्थित राहणे टाळले. त्यांचा नेहमीच आदर व सन्मान राखला आहे. तसेच मुंबई विद्यापीठामार्फत पाली विभागासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून स्वतंत्र मजला तयार करण्यात आला. पाली भाषेची व्याप्ती वाढविण्यासाठी कल्याण येथे विविध प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने निवेदनात स्पष्ट केले.