पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेला माहितीपट शनिवारी सायंकाळी देवनारमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) या संस्थेत मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार होता. याबाबतची माहिती मिळताच भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी टीस संस्थेच्या बाहेर जोरदार आंदोलन केले. दरम्यान, संस्थेमध्ये मोठ्या पडद्याऐवजी लॅपटॉपवर हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. या प्रकारामुळे भाजप युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

बीबीसीने तयार केलेल्या महितीपटावरून सध्या देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी देवनारमधील टीस संस्थेत शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा माहितीपट दाखवण्याचे आयोजन केले होते. संस्थेतील विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर हा माहितीपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे भाजप युवा मार्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि हा माहितीपट दाखवण्यास विरोध दर्शवित आंदोलन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी सकाळपासून पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही वेळानंतर कार्यकर्ते तेथून निघून गेले.

हेही वाचा – मुंबई – हमालाचा खून करणारा आरोपी अटकेत

संस्थेला कोणतीही पूर्वकल्पना न देता, तसेच परवानगी न घेताच काही विद्यार्थ्यांनी हा माहितीपट दाखवण्याचे आयोजन केल्याचा आरोप यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवू नये, अशी मागणी करणारे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच पोलिसांच्या अश्वासनानंतर भाजप युवा मोर्चाने आंदोलन मागे घेतले. मात्र हा माहितीपट दाखवण्यात आला, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला. मात्र असे असतानाही टीसमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्याऐवजी लॅपटॉपवर हा माहितीपट दाखविण्यात आला. विद्यार्थी गटागटाने लॅपटॉपसमोर बसून हा माहितीपट पाहात होते. या प्रकारामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

हेही वाचा – मुंबई : बीबीसीच्या माहितीपटाच्या प्रदर्शनावरून गोंधळ, ‘टीस’बाहेर भाजप युवा मार्चाचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांकडून विरोध

माहितीपट दाखवण्यावरून पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची टीसच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती. याचा त्रास सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. यामुळे येथील वातावरण तंग झाले होते. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन काही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आवारात हा माहितीपट दाखवण्यास विरोध दर्शवला होता.