‘व्हिवा लाऊंज’मध्ये शुक्रवारी गप्पांची संधी
मंगेशकर घराण्यातून गाण्याचा आणि संगीताचा वारसा परंपरेने मिळालेल्या राधा मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात स्वत:ची वाट निर्माण केली आहे. वयाच्या सातव्या वर्षी ‘भावसरगम’पासून केलेली सुरुवात ते ‘कहे मीरा सूर कबीर’, ‘रवींद्र संगीत’सारखे स्वत:चे कार्यक्रम करणाऱ्या या तरुण गायिकेशी गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात मिळणार आहे.
‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ प्रस्तुत आणि लागू बंधू सहप्रायोजित ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाचे नवे सत्र शुक्रवारी, ३० मार्च २०१८ रोजी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात संध्याकाळी ६ वाजता रंगणार आहे. राधा सात वर्षांची असताना तिने वडिलांच्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमात गाणे सादर करून गायन क्षेत्रात पदार्पण केले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचे धडे राधाने वडील पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे गिरवले.
हृदयनाथ मंगेशकर हेच तिचे गुरू. लता, आशा, उषा, मीना या तिच्या चारही आत्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी तिला लाभले. राधाचे वैयक्तिक कार्यक्रम आणि संगीत मैफली सुरू असतात. महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात तिचे गाण्याचे कार्यक्रम आणि मैफली झाल्या आहेत. राधाने गायलेल्या गाण्यांचा ‘नाव माझे शामी’ अल्बमही प्रकाशित झाला आहे. याचे संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे असून लता मंगेशकर यांनी हा अल्बम प्रस्तुत केला आहे. राधाचा सुरमयी प्रवास जाणून घेण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’च्या निमित्ताने मिळणार आहे. कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने प्रवेश दिला जाईल.