मुंबई : महाडजवळील तळीये गावातील कोंढाळकरवाडीतील दरड कोसळण्याच्या घटनेला चार वर्षे पूर्ण झाली. या दुर्घटनेनंतर दरडग्रस्तांसह आसपासच्या धोकादायक क्षेत्रातील कुटुंबांसाठी २७१ घरे बांधण्याची जबाबदारी म्हाडाच्या कोकण मंडळावर सोपविण्यात आली. कोकण मंडळाने २०७ घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला असून यातील ६६ घरांचा ताबा कोंढाळकरवाडीतील दरडग्रस्तांना देण्यात आला आहे. सध्या ७२ घरांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र त्याचवेळी २७१ पैकी ४४ घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच मिळालेली नाही. त्यामुळे या घरांचे कामच सुरू होऊ शकलेले नाही. या घरांसाठी जमीन मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, मात्र कोकण मंडळाला यात यश आलेले नाही. घरांचे काम रखडल्याने धोकादायक क्षेत्रातील कुटुंबांना जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.

तळीयेतील कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली आणि यात ८८ जणांचा मृत्यू झाला. तर ६६ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेला चार वर्षे पूर्ण झाली. दुर्घटनेनंतर दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून दरडग्रस्तांना घरे बांधून देण्याचा निर्णय झाला. मात्र त्याचवेळी केवळ दरडग्रस्तांसाठी नव्हे तळीयेतील आसपासच्या धोकादायक क्षेत्रातील रहिवाशांसाठीही घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोकण मंडळाने २७१ घरांचा प्रकल्प हाती घेतला. २७१ घरांपैकी २२७ घरांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा उपलब्ध झाली आणि या २२७ घरांना परवानगीही मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर २०७ घरांच्या बांधकामाला कोकण मंडळाने सुरुवात केली. यापैकी ६६ घरे सर्वात आधी पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. आतापर्यंत १३५ घरांचे काम पूर्ण करण्यात आले असून यातील ६६ घरांचा ताबा दरडग्रस्तांना देण्यात आला आहे. तर १३५ पैकी २६ घरांच्या चाव्या तहसीलदारांकडे सोपविण्यात आल्या असून ४३ घरांना निवासी दाखला मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकण मंडळाने १३५ घरांचे काम पूर्ण केले असून सध्या ७२ घरांचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित २० घरे जिथे बांधायची आहेत तिथे कंटेनर आहे. हे कंटेनर हटवून लवकरच उर्वरित २० घरांचे काम सुरू करण्यात येणार आहे. मात्र २७१ पैकी ४४ घरांसाठी जमीनच उपलब्ध नसल्याने या घरांचे काम रखडले आहे. जमीन मिळावी यासाठी सातत्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र जमीन उपलब्ध झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमीन उपलब्ध झाल्यानंतरच या घरांचे काम सुरू होईल. तर ७२ घरांचे कामही लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.