मुंबई : संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. याचबरोबर संपूर्ण राज्यात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर आता फारशा पावसाची शक्यता नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी.

‘शक्ती’ चक्रीवादळ रविवारी सकाळी ५.३० च्या सुमारास अरबी समुद्रात, तसेच रस अल हद्द-ओमानच्या २५० किमी आग्नेय-ईशान्येला, कराची – पाकिस्तानच्या ७०० किमी आग्नेय – पश्चिमेला, द्वारकेच्या ७७० किमी पश्चिमेला आहे. या चक्रीवादळाची तीव्रता सोमवारी सकाळी कमी होण्याची शक्यता आहे. ओडिशातील कमी दाब क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भ, मराठवाडा भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर फारसा नसेल. सध्या राज्यात कधी पाऊस तर कधी ऊन असे वातावरण आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही भागात तापमानाचा पारा चढा आहे. त्यामुळे उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मोसमी वाऱ्यांची वाटचाल अडखळलेलीच

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २६ सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान, जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून माघार घेतली आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर आठवडाभरापासून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास थांबल्याने वेरावल, भरूच, उज्जैन, झांसी, शहाजहानपूरपर्यंत मोसमी वाऱ्यांची सीमा शनिवारी कायम होती.

ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

ब्रह्मपुरी येथे रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल अकोला येथे ३३.५ अंश सेल्सिअस, वर्धा ३२.१ अंश सेल्सिअस, बुलढाणा ३१.२ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर येथे ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.