मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी पडलेल्या पावसाने मध्य रेल्वेला झोडपून काढले. दक्षिण मुंबईत रविवारी रात्रीपासून पाऊस कोसळत होता. तर, सोमवारी पहाटेपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस धारा कोसळू लागल्या. यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे रूळावर पाणी साचल्याने लोकल सेवा काही काळ ठप्प होती. तर, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा कूर्मगतीने धावत होती.

राज्यात रविवारी पावसाचे आगमन झाले अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह उपनगरात रविवारी सायंकाळपासून पाऊस पडू लागला. तर, सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल लोकल सेवा अतिशय संथगतीने सुरू होती. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मशीद, भायखळा, दादर, शीव दरम्यान पाणी साचल्याने अनेक लोकल एका मागे एक उभ्या होत्या. कुर्ला ते शीव दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत. शेकडो प्रवासी लोकलमध्ये ताटकळत बसले. मशीद आणि भायखळा दरम्यान पाणी साचल्याने, लोकल भायखळापर्यंत चालवून पुन्हा डाऊन मार्गावर धावल्या. त्यामुळे सीएसएमटीकडे लोकल सेवा ठप्प झाली. तसेच ज्या लोकल कुर्ल्यापर्यंत पोहचल्या, त्यांना कुर्ल्या स्थानकात रद्द केल्या. त्यामुळे कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली होती. कुर्ला स्थानकात लोकल पोहचल्यानंतर, ही लोकल रद्द केली असून, सीएसएमटी लोकल जाणार नाही, अशी स्थानकात उद्घोषणा केली गेली. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. कुर्ला – शीव दरम्यानच्या ४ मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४० मिनिटे लागली. त्यामुळे कार्यालयात पोहचण्यास कर्मचाऱ्यांना विलंब झाला.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील यार्डमध्ये पाणी भरल्याने, लोकल सेवा कोलमडली होती. फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि १० ते १८ वरील लोकल सेवा आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला. तसेच फलाट क्रमांक ३ येथे पाणी साचले. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली होती. आसनगाववरून सुटलेली लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात आली. त्यानंतर ती लोकल कल्याण येथे रद्द करून, कसारा विशेष लोकल म्हणून चालवण्यात आली. प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले. तसेच आसनगावरून सुटलेली लोकल बराच वेळ कळवा येथे उभी होती. यासह कुर्ला, घाटकोपर येथे लोकल एका मागे एक अडकल्या होत्या, असे प्रवाशांनी सांगितले.

सकाली पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने, लोकल उशिराने धावत होत्या. तर, सकाळी ९ दरम्यान मशीद, भायखळा, दादर, माटुंगा, बदलापूर येथील रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे लोकल सेवा कूर्मगतीने सुरू आहे. मशीद येथे रेल्वे रूळावर प्रचंड पाणी साचल्याने, सकाळी १०.२५ वाजता हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गिका कूर्मगतीने धावत आहे. अप आणि डाऊन लोकल सेवा ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. यासह लांबपल्ल्याच्या रेल्वे सेवा अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत. सकाळी ११.३० च्यादरम्यान मशीद येथील पाणी ओसरल्याने, सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा सुरू केली.

पावसाने मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली. लोकल एकामागे एक उभ्या होत्या. सकाळी कार्यालय गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला नियोजित लोकल मिळाल्या नाहीत. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळीत राहण्याचे दावे पहिल्याच पावसाने खोटे ठरवले. रेल्वे रुळांवर पाणी तुंबले. त्यामुळे एकूणच पावसाळापूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित झाले. रेल्वेने या परिस्थितीबाबत मुंबई महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवले आहे. मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि मुंबई पालिकेच्या भूमीगत नाले ओसंडून वाहू लागल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे ‘एक्स’वरून मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने माहिती दिली.

– पहिल्या पावसात सोमवारी मुंबई शहरात २५३ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला.

– सीएसएमटी येथील ओएनजीसी यलो गेट आणि भायखळा परिसरातील महालक्ष्मी पंपिंग केंद्र सुरू झाले नाही. महालक्ष्मी पंपिंग स्थानक ११.३० तासांच्या सुमारास सुरू झाले.

– सकाळी ११. २४ वाजता ४.७५ मीटर उंचीवर भरती येत असल्याने, पूर दरवाजे जवळजवळ एक तास आधी बंद करावे लागले. ज्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्यास अडथळा निर्माण झाला.

– दादर आणि परळ येथील २० लोकल सेवा रद्द केल्या.

– हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान लोकल सेवा बंद असल्याने ३० लोकल सेवा रद्द करण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– पावसामुळे सुमारे आठ मेल, एक्स्प्रेस सुमारे दोन तास उशिराने धावल्या.