scorecardresearch

‘शिवतिर्थ’वर राज ठाकरेंनी एकाच वेळी घेतली ५० वकिलांची भेट; मनसेनं केला भेटीमागील कारणाचा खुलासा

आज दुपारी १२ च्या सुमारास दादरमधील राज ठाकरेंच्या ‘शिवतिर्थ’ या निवासस्थानी वकिलांच्या टीमने राज यांची भेट घेतली

Raj Thackeray MNS
शिवतिर्थ या निवासस्थानी घेतली वकिलांची भेट (फाइल फोटो सौजन्य सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आज ५० वकील शिवतिर्थ या निवासस्थानी पोहोचले होते. दुपारी १२ च्या सुमारास मनसेच्या जनहित आणि विधी कक्षाच्या वकिलांच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मनसे जनहित व विधी विभागाचे सरचिटणीस अ‍ॅडव्हकेट किशोर शिंदे यांनी दिली.

भोंगे आंदोलनात पोलीसांकडून कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि यासंदर्भात वकिलांनी केलेले काम या बाबत माहिती देण्यासाठी वकिलांची टीम राज ठाकरेंच्या भेटीला गेली होती अशी माहिती समोर आलीय. मनसेच्या जनहित आणि विधी कक्षाच्या वकिलांची टीम राज ठाकरेंच्या भेटीला आली होती. ५० वकिलांची टीम शिवतीर्थावर हजर होती, असंही शिंदेंनी सांगितलं.

“वकिलांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांचे आभारही मानले. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडली. येत्या काही दिवसात जनहित आणि विधी कक्षाचा मेळावा घेण्यात येईल,” असंही शिंदेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी या वकिलांची भेट घेतल्याने मनसे आता मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील आंदोलनात कार्यकर्त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीशींबद्दल कायदेशी मार्गाने आक्रमक भूमिका घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच या कायदेशीर सेलच्या माध्यमातून न्यायालयीन लढाईसाठी मनसे सज्ज होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.

“मनसेत ज्या वकिलांना काम करायचे असेल त्यांसाठी सभासद नोंदणीचा विशेष कार्यक्रम राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात येणार आहे,” असंही शिंदेंनी म्हटलं आहे. “काही गोष्टींचा पीआर असेल किंवा कोर्टाच्या संदर्भातील आमचे कोल्हापूरचे अध्यक्ष आनंद चव्हाण यांनी आरटीआय टाकला होता. त्याबद्दल माहिती मिळाली नाही, यात पुढे काय करायचंय यासंदर्भात खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन राज ठाकरेंनी केलं,” असंही शिंदे म्हणाले.

खूप वेगळ्या पद्धतीचं काम आमच्या लीगल सेलच्या माध्यमातून केलं जाणार आहे, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray meeting with 50 advocates of mns legal cell scsg

ताज्या बातम्या