मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही म्हटलं. यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार असा सवालही केला. ते गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे म्हणाले, “आपण जातीपातीत अडकून पडणार असू तर कसलं हिंदुत्व घेऊन बसलो आहोत आपण? एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो हिंदू हा केवळ हिंदू-मुस्लीम दंगलीत हिंदू असतो. तो २६ जानेवारी, १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत? तो जेव्हा ना हिंदू असतो, ना भारतीय असतो त्यावेळी तो होतो मराठी, गुजराती, तमीळ, बंगाली, पंजाबी. तो जेव्हा मराठी होतो त्यावेळी तो होतो मराठा, त्यावेळी तो होतो ब्राह्मण, त्यावेळी तो होतो माळी, त्यावेळी तो होतो आणखी आगरी.”

“राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण वाढलं”

“काही लोकांना ही गोष्ट हवी आहे, काही लोकांना कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. याआधी जात नव्हती का? होती, पण त्याआधी जातीचा अभिमान होता. मात्र, १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला,” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

“बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे”

राज ठाकरे म्हणाले, “तो त्या जातीचा हा या जातीचा असं म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं आमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार.”

हेही वाचा : “मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष कधी ठरलं?”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

“जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?”

“आम्ही इतिहास वाचतच नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की जातपात गाडून स्वराज्यासाठी एक व्हा त्या महाराष्ट्रात जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत, राजकारण सुरू आहेत. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, मग आम्ही हिंदू कधी होणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray serious allegations on sharad pawar about caste politics pbs
First published on: 02-04-2022 at 21:23 IST