मुंबई: हिंदी सक्ती विरोधासाठी एकत्र आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. उभयतांमध्ये गेल्या दोन महिन्यांतील चौथी भेट बुधवारी झाली.

मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे या महापालिकांतील निवडणूक रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते. महाविकास आघाडीत निवडणूक लढणे शक्य न झाल्यास राष्ट्रवादीला (शरद पवार) सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका मांडली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. हिंदी सक्तीविरोध, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे यांनी घेतलेली भेट, गणेशोत्सवात शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कुटुंबीयांची भेट अशा भेटीगाठींनंतर दोन्ही कुटुंबातील स्नेह वाढला. त्याचे रूपांतर आता राजकीय युतीत होणार हे निश्चित मानले जात असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी खासदार संजय राऊत यांच्यासह राज ठाकरे यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बंद दाराआड सुमारे पावणेतीन तास चर्चा झाली.

महापालिका निवडणुका महाविकास आघाडीत लढायच्या की स्वतंत्र युती करून लढायच्या यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून सांगण्यात आले. बैठकीदरम्यान मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महापलिकांबाबत विशेषकरून चर्चा करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी घेतलेली भेट आणि राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील सहभागाबाबत झालेल्या चर्चेविषयीही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना अवगत केले. जर काँग्रेसला सोबत येणे शक्य नसेल तर राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यासोबत युती करून मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतचा पर्यायाची चाचपणीही करण्यात आली. अन्य महापालिकांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

चर्चेवेळी शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित असलेले शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले. गणपतीवेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावरून निघताना उद्धव ठाकरे यांना सांगितले की, गर्दीमुळे आपल्याला बोलता आले नाही. तेव्हा पुन्हा नंतर मला भेटायला या. त्यानुसार कुंदा मावशींना भेटायला आज उद्धव ठाकरे राज यांच्या घरी गेले होते, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर

शिवसेना ठाकरे गटाचा वार्षिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची मेळाव्यासााठी परवानगी मिळाली आहे. , शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्यात राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली. या मेळाव्यातच महायुतीची घोेषणा होईल, असा अंदाज बांधला जात आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्याकडून याबाबत विधान करण्यात आले होते. याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिवंगत समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिसही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे.