मुंबई : केंद्र, राज्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद, महापालिकांकडे वळविला असून या निवडणुकांचा निकाल निश्चित झाला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये सुमारे ९६ लाख खोटे मतदार याद्यांमध्ये घुसविण्यात आले आहेत. त्यामुळे जोवर मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, आणि त्या सर्व पक्षांना मान्य होत नाहीत. तोवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला.

राज्यात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या वेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करीत केंद्र-राज्य सरकार व अदानी-अंबानींवर तीव्र हल्ला चढवला.

सदोष मतदार याद्यावरून आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात. त्यांनी यावेळीही आखलेला डाव उधळला जाण्याच्या धास्तीमुळे सत्ताधाऱ्यांची चिडचिड होत असल्याचे सांगत ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस मतदार यादीत घुसविण्यात आल्याचा आरोप केला. विरोधकच नव्हे सत्ताधारी पक्षाचे आमदारही मतदार यांद्यामध्ये घोळ असल्याचे सांगत असून काहींनी तर २०-२० हजार मतदार बाहेरून आणल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना २३२ जागा मिळूनही राज्यात कुठेही विजयाचा जल्लोष झाला नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 

सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

’ आपण प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर होणार असेल, तर खपवून घेणार नाही.

’ तुम्हाला वाटत असेल हे रस्ते, अटल सेतू या सर्व योजना तुमच्यासाठी आहेत. पण या सर्व सोयी सुविधा उद्योगपतींनी जमिनी घेतल्या आहेत, त्याच्यासाठी असून जिथे नजर पडेल ते सर्व आपल्याला पाहिजे अशी भूमिका काही उद्योगपतींनी घेतली आहे. दुर्दैवाने त्यांना आपली मराठी माणसेच मदत करीत आहेत.

’ केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता आहे आणि जिल्हा परिषदा, महापालिकाही हातात आल्या, तर रानच मोकळे होईल. हे सर्व सहज नाही, तर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मोठा डाव आखल्याचा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.

’ मनसे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर

मतदार याद्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार

असून त्यात दुरुस्त्या झाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.

राज्यातील विविध प्रकल्प, जमिनी अदानी, अंबानीच्या घशात घातल्या जात असून आता शहरेही त्यांना आंदण देण्याचा डाव आखला जात आहे. ठाणे जिल्ह्यावर कब्जा केल्याशिवाय मुंबईला हात लावता येत नाही, म्हणून बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळनंतर आता संजय गांधी उद्यानातील झाडे तोडून, तेथील आदिवासींना हटवून ही जागा अदानीला देण्याचा घाट घातला जात आहे. – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना</strong>