मुंबई : राज कुमार राव अभिनित ‘भूल चूक माफ’ हा चित्रपटाचा सिनेमागृहात प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर, चित्रपटाचे निर्माते तो ओटीटीवर कधीही प्रदर्शित करू शकतील. चित्रपटगृहात प्रसिद्ध झाल्यानंतर आठ आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड आणि चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मॅडॉकतर्फे ही माहिती गुरूवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. ती न्यायालयाने नोंदवून घेतली.
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट १६ मे रोजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात पीव्हीआर आयनॉक्सने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने पीव्हीआरची बाजू योग्य मानून चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती दिली होती. या निर्णयाला मॅडॉकने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे गुरूवारी मॅडॉकच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, चित्रपटाच्या सिनेमागृह आणि ओटीटी प्रदर्शनाबाबत परस्पर सहमतीने घेतलेल्या निर्णयाची पीव्हीआर आणि मॅडॉकने न्यायालयात लेखी माहिती सादर करण्यात आली. त्यात, चित्रपट २३ मे रोजी चित्रपटगृहात प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर, मॅडॉक कधीही ओटीटीवर प्रसिद्ध करू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.
वाद काय होता ?
मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या इतरांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक करार केला होता. या करारानुसार, ९ मे २०२५ रोजी भारतातील पीव्हीआर थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास सहमती दर्शविली होती. तथापि, ६ मे २०२५ रोजी हा करार अचानक रद्द करण्यात आल्याचा दावा करून पीव्हीआरने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती दिली होती.
पीव्हीआरचा दावा
पीव्हीआरने चित्रपटाच्या प्रदर्शनावर खर्च केला होता आणि ९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आधीच तिकीट नोंदणी सुरू केली होती. परंतु आता हा चित्रपट १६ मे रोजी चित्रपटगृहांऐवजी ऑनलाईन व्यासपीठावर (ओटीटी) प्रदर्शित केला जाणार आहे, असा युक्तिवाद पीव्हीआरच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.
मॅडॉकचे म्हणणे…
मॅडॉकच्या वतीने पीव्हीआरच्या या मागणीला विरोध करण्यात आला होता. तसेच, पीव्हीआरने कराराचा चुकीचा अर्थच लावल्याचा आणि चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यास आठ आठवडे तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यास मज्जाव असल्याचा दावा केला. देशभरात आणि विशेषतः देशाच्या उत्तरेकडील भागात भारत-पाकिस्तानमधील युद्धसदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, तो इतर व्यासपीठांवर प्रदर्शित करण्यास कोणताही प्रतिबंध नाही, असेही मॅडॉकच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता.
न्यायालयाने स्थगिती देताना काय म्हटले होते ?
हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. त्यामुळे, पीव्हीआरने चित्रपटाची प्रसिद्धी केली होती. तसेच, आगाऊ तिकीट नोंदणीही सुरू केली होती. तथापि, शेवटच्या क्षणी चित्रपट निर्मार्त्यांनी करार रद्द केल्याने पीव्हीआरच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे, असे नमूद करून एकपीठाने चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती दिली होती.