संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :  आगामी वर्षांत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होत असतानाच राज्यसभेचे सहा तर विधान परिषदेचे तब्बल २१ आमदार निवृत्त होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक होणार असल्याने राष्ट्रवादीचा शरद पवार गट  तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उमेदवार निवडून आणण्याकरिता कसरत करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या सहा तर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होईल. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्राबल्य असल्याने शरद पवार आणि ठाकरे गटाला राज्यसभा तसेच विधान परिषदेत उमेदवार निवडून आणण्याकरिता मतांची जुळवाजुळव करावी लागेल.

 विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.   प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २५ मतांची आवश्यकता असेल. भाजपचे चार उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे निवडून येऊ शकतात. शिंदे गट दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात असेल. अजित पवार गटाकडे १५ अतिरिक्त मते असल्याने दुसऱ्या उमेदवारासाठी प्रयत्नशील असेल. काँग्रेसचा एक उमेदवार सहजच निवडून येऊ शकतो. काँग्रेसकडील अतिरिक्त मते, पवार आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे दोन उमेदवारांसाठी प्रयत्न केले जातील. काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवरच पवार, ठाकरे गटाचे भवितव्य अवलंबून असेल. 

हेही वाचा >>>शिखर बँक घोटाळा प्रकरण: तपासाची स्थिती काय? तो कधीपर्यंत पूर्ण करणार? विशेष न्यायालयाचे ईओडब्ल्यूला आदेश

राज्यसभेच्या सहा जागंसाठी फेब्रुवारी वा मार्चमध्ये निवडणूक होईल. प्रत्येक उमेदवाला पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता असेल. भाजप, शिंदे गट, काँग्रेस यांचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात़. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गट यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी जुळवाजुळव करावी लागणार आह़े यामुळे निवृत्त होणाऱ्या अनिल देसाई व वंदना चव्हाण यांच्यापुढे पुन्हा निवडून येण्याचे आव्हान असेल.

निवृत्त होणारे खासदार, आमदार

’ राज्यसभेचे निवृत्त होणारे सहा सदस्य:  (२ एप्रिलला मुदत संपणार)

केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही. मुरलीधरन व प्रकाश जावडेकर (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट)

’ विधान परिषदेचे निवृत्त होणारे २१ सदस्य : ( सर्व आमदार जून-जुलैमध्ये निवृत्त होणार आहेत. )

’ विधानसभेतून निवडून आलेले  हे  ११ आमदार निवृत्त होणार :  भाई गिरकर, रमेश पाटील, रामराव पाटील, निलय नाईक (भाजप), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), वजाहत मिर्झा व प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुर्राणी (राष्ट्रवादी अजित पवार गट), जयंत पाटील (शेकाप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष) .

’ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवृत्त होणार  सहा सदस्य:

अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) – राष्ट्रवादी अजित पवार गट, नरेंद्र दराडे (नाशिक) – शिवसेना ठाकरे गट, रामदास आंबटकर (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) – भाजप, विप्लप बजोरिया (परभणी-हिंगोली) शिवसेना शिंदे गट, प्रवीण पोटे (अमरावती) – भाजप, सुरेश धस (लातूर-बीड) – भाजप

’ पदवीधर  निवृत्त होणारे दोन सदस्य:  विलास पोतनीस (मुंबई) शिवसेना ठाकरे गट, निरंजन डावखरे (कोकण) – भाजप

’ शिक्षक निवृत्त होणारे दोन सदस्य: :  कपिल पाटील (मुंबई) – जनता दल (यू), किशोर दराडे (नाशिक) – अपक्ष

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha legislative council election the challenge of numerical strength before pawar thackeray groups amy
First published on: 18-12-2023 at 04:59 IST