मुंबई : बहिण-भावाच्या प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाला यंदा राजकीय रंग आला असून बाजारात पारंपरिक मणी – मोत्यांच्या राख्यांसह राजकीय नेत्यांच्या प्रतिमा असलेल्या राख्या देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे कमळ चिन्ह, श्रीराम, तसेच, भारतीय जवान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेची प्रतिमा असलेल्या राख्या ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत. कपाळावर केशरी गंध, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व त्याखालील जय श्री राम हे वाक्य असलेली राखी विशेष लक्ष वेधून घेत आहे.
बहीण – भावाच्या प्रेमाची विण जपणाऱ्या रक्षाबंधन सणाला गेल्या काही वर्षांपासून धार्मिक, राजकीय रंग दिला जात आहे. विशेषतः राख्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रक्षाबंधनानिमित्त यंदा बाजारात आलेल्या हिरे, मणी – मोत्यांच्या विविधरंगी राख्यांनी बाजार सजला आहेत.
बाजारात १० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध असून पारंपरिक मणी – मोती, पर्यावरणपूरक, मॉडर्न, गोंडे, झरी – रेशीम धाग्याच्या राख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्याचबरोबर देशभक्ती, धार्मिक, राजकीय थीमच्या राख्या देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची प्रतिमा असलेल्या राख्या देखील आता बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या राख्या बाजारात १० ते १५ रुपयांत उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
अनेकजण मोठ्या प्रमाणावर या राख्या घेऊन जात असल्याचे दादरमधील एका राखी विक्रेत्याने सांगितले. तसेच, भाजप पक्षाचे चिन्ह असलेली कमळाच्या प्रतिमेची राखी विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. जरी – रेशीमाच्या धाग्यात गुंफलेल्या या राखीला मोठी मागणी आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदुर’ कारवाई केली. या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांची प्रतिमा असलेल्या राख्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या राख्या केवळ १० ते २० रुपयांत बाजारात उपलब्ध असून भारतीय राष्ट्रध्वजाच्या प्रतिमेच्या राख्याही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
श्रीराम, राम – सीता, ओम यांच्या प्रतिमा असलेल्या राख्या देखील १५ ते २० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त महाकाल, गणपती, महादेव, कृष्ण या राख्यांनाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राजमुद्रेच्या राख्यांनाही भरपूर प्रतिसाद मिळत असून ५० ते १०० रुपयांपर्यंत या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
‘ब्रो’ कड्यांना अधिक प्रतिसाद
गेल्या दोन वर्षांपासून ‘ब्रो’ हा शब्द लिहिलेली राखी बाजारात उपलब्ध झाली आहे. यंदा हीच राखी आता कड्याच्या स्वरूपात बाजारात दाखल झाली आहे. केवळ ६० रुपयांमध्ये मिळणारी ही कड्याची राखी अनेक महिलांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच, या राख्यांची सर्वाधिक विक्री झाल्याचे भात बाजारातील विक्रेत्याने सांगितले.