मुंबई : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर दुर्मिळ ‘मास्कड बूबी’ या सागरी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन घडले असून दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे किंवा वादळांनंतर ‘मास्कड बूबी’ किंवा इतर काही सागरी पक्षी किनाऱ्यावर येतात. गेल्या काही दिवसांत समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मास्कड बूबी’ला जीवदान देण्यात आले.
‘मास्कड बूबी’ हा मूळतः उष्ण कटिबंधीय सागरी भागांमध्ये आढळणारा पक्षी असून, भारतात तो क्वचितच दिसतो. पांढऱ्या रंगाचे शरीर, काळसर चोच व डोळ्याभोवती काळ्या रंगाची कडा यामुळे त्याला सहज ओळखता येते. मोठ्या समुद्री लाटांमुळे दिशाभूल झाल्यास किंवा थकव्यामुळे हे पक्षी किनाऱ्यावर येतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोराई परिसरात तीन ‘मास्कड बूबी’ आढळले होते. रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ फॉर वाइल्ड लाइफ (रॉ) या वन्यजीव संस्थेने त्यांना जीवदान दिले असून सध्या त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात आणि चौक, खालापूर रेल्वे स्थानकाजवळ ‘मास्कड बूबी’ सापडला होते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुर्डी किनाऱ्यावर ‘मास्कड बूबी’ आढळला होता. थकल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर आणि वनविभागाने त्याला जीवदान दिले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर काही तासांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याचबरोबर जून महिन्यात मालवणमध्ये ‘मास्कड बूबी’चे दर्शन झाले होते. तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर मालवणमधील युथ बीट्स फाॅर क्लायमेट या संस्थेला याबाबत माहिती देण्यात आली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. ‘मास्कड बूबी’चे हे लहान पिल्लू थकले होते. त्यामुळे त्याला उडताही येत नव्हते. रात्रभर त्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. सकाळी हे पिल्लू ताजेतवाने झाले. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
दरम्यान, मुंबईत ‘मास्कड बूबी’च्या काही दुर्मिळ नोंदी आहेत. प्रामुख्याने वादळांनंतर तो किनाऱ्यावर आढळला होता. साधारण २००० नंतर मुंबईत वर्सोवा, मढ, आणि अंधेरी किनारा परिसरात तो आढळला होता. त्या वेळी हे पक्षी अशक्त, थकलेले, किंवा इजा झालेल्या अवस्थेत होते. वांद्रे समुद्रकिनाऱ्यावर २०२१ मध्ये मास्कड बूबी मृत अवस्थेत आढळल्याची नोंद आहे.
वनविभाग व निसर्गप्रेमींचे आवाहन
– ‘मास्कड बूबी’ हा संरक्षित पक्ष्यांमध्ये मोडत नाही, मात्र दुर्मीळ असल्यामुळे त्याचे संरक्षण महत्त्वाचे आहे.
– नागरिकांनी असे पक्षी दिसल्यास त्यांना त्रास न देता वनविभाग, स्थानिक पक्षीमित्र संघटना यांना तात्काळ माहिती द्यावी.
– शक्य असल्यास पक्ष्याचे छायाचित्र काढून ठिकाण, वेळ, परिस्थिती याची नोंद ठेवावी.