मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नरिमन पाॅईंट येथील ४.२ एकर जागा मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) खरेदी केली. या व्यवहारासाठी आरबीआयने तब्बल ३,४७२ कोटी रुपये मोजले आहेत. आता या जागेवर आरबीआय नवीन कार्यालय बांधणार आहे. या जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून एमएमआरसीला मिळालेल्या महसूलाचा उपयोग मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे) मार्गिकेच्या आर्थिक बळकटीकरणासाठी केला जाणार आहे.
एमएमआरसीकडून ३ ऑक्टोबर २०२४ रोजी नरिमन पाॅईंटसह अन्य काही ठिकाणच्या जमिनीच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तर जमिनीच्या विक्रीसाठी नाईट फ्रँक इंडिया कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. नरिमन पाॅईंट येथील जमिनीच्या खरेदीसाठी आरबीआयने उत्सूकता दर्शवली होती. आपल्या नवीन कार्यालयासाठी ही जागा देण्याचा प्रस्ताव आरबीआयने एमएमआरडीएकडे पाठवविला होता. त्यानुसार या प्रस्तावाला एमएमआरसीने राज्य सरकार आणि एमएमआरसी मंडळाची मंजुरी घेतली.
या जमिनीसाठी काढण्यात आलेली निविदा १८ जानेवारी २०२५ रोजी रद्द करण्यात आली. तसेच ही जमीन आरबीआयला देण्याची पुढील कार्यवाही करण्यात आली असून नुकतीच ही जमीन आरबीआयला विकण्यात आली आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्री कराराची औपचारीक नोंदणी ५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली.
एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार नरिमन पाॅईंट येथील ४.२ एकरचा अर्थात १६८३२.३२ चौरस मीटर क्षेत्रफळा भूखंड ३,४७२ कोटी रुपयांत आरबीआयला देण्यात आला आहे. नरिमन पाॅईंट येथील या जमिनीवर आता आरबीआय नवीन कार्यालय बांधणार आहे. या कार्यालयाच्या बांधकामासाठी आरबीआयला १६ लाख चौरस फूट इतके बांधकाम क्षेत्र (बिल्ट अप एरिया ) उपलब्ध होणार आहे.
नरिमन पाॅईंट येथील हा सर्वात मोठा विकला गेलेला शेवटचा भूखंड मानला जात आहे. या जमिनीचा व्यवहार मोठा आणि महत्त्वाचाही मानला जात आहे. त्याचवेळी या जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या रक्कमेचा वापर एमएमआरसी मेट्रो ३ मार्गिकेच्या विकासासाठी करणार आहे.