मुंबई : मुंबई व सर्वच मोठ्या महानगरांमधील पायाभूत सोयीसुविधांची आव्हाने, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील प्रश्न, त्यासाठी करण्यात येत असलेले उपाय यांवर ‘लोकसत्ता’च्या वतीने येत्या गुरुवारी (१६ ऑक्टोबर) घरबांधणी क्षेत्राशी संबंधित परिषद (रिअल इस्टेट काॅनक्लेव्ह) आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित राहणार असून, सरकारच्या वतीने हे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर ते भूमिका मांडतील.
मुंबईसह ठाणे, पुणे, नवी मुंबई आदी सर्वच महानगरांमधील पायाभूत सुविधा हा गहन विषय ठरला आहे. पायाभूत सुविधांवर राज्य सरकारने भर दिला आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मुंबईतील भुयारी मेट्रो प्रकल्प नुकताच कार्यांन्वित करण्यात आला. मुंबई महानगरात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सागरी मार्ग हा पर्यायी मार्गही सुरू झाला आहे. याशिवाय विविध प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. त्याचप्रमाणे घरबांधणी क्षेत्रात अनेक घडामोडी घडत आहेत. घरांच्या किमती हा कळीचा मुद्दा. त्या कमी करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. त्यासाठी परवडणारी घरे या योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांवर ऊहापोह करतील.