संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाच्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा उपचार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्यानंतर नायर रुग्णालयाने बाजी मारत करोनातून बरे झालेल्या तब्बल ८० रुग्णांचा प्लाझ्मा जमा केला असून यातून ५६ करोना रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहे. यात ५५ रुग्णांना त्याचा फायदा झाला असून केवळ एका गंभीर आजारी रुग्णाचा मृत्यू झाला.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिका रुग्णालयांसाठी प्लाझ्मा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यापासून मुंबईत धारावी व चेंबूरसह अनेक ठिकाणी प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेत धारावीत प्लाझ्मा दान शिबीर आयोजित केले. शिवसेनेच्या नगरसवकांनीही यात पुढाकार घेतला असून करोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करायला लावणे हे एक आव्हान असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. याची दोन कारणे आहेत. या रुग्णांना एकदा आवश्यक चाचण्यांसाठी एकदा पालिका रुग्णालयात यावे लागते तर ते पात्र दाते असल्याचे चाचणीत दिसून आल्यानंतर प्रत्यक्ष प्लाझ्मा दानासाठी दुसऱ्यांदा यावे लागते. दुसरं असे की बहुतेक प्रकरणात घरच्यांचा रुग्णालयात जाण्यास मोठा विरोध असतो. यातून मार्ग काढत आमच्या रक्तपेढीच्या लोकांनी तसेच संबंधित विभागातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नातून नायर रुग्णालयाला तब्बल ८० प्लाझ्मा दाते मिळाले आहेत.

साधारणपणे एका दात्याकडून प्लाझ्मा काढण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतात. आम्ही एकूण २०० दात्यांची चाचणी केली होती. यातील पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ८० दात्यांचा प्लाझ्मा आम्ही मिळवला आहे. येत्या दोनचार दिवसात आणखी ३१ दाते प्लाझ्मा देणार असल्याचे डॉ. मोहन जोशी म्हणाले. माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतच नव्हे तर राज्यात व देशातही नायर रुग्णालयाने सर्वाधिक प्लाझ्मा दाते गोळा केले असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. यातून आम्ही एकूण ५६ रुग्णांवर प्लाझ्मा उपचार केला असून त्याचा फायदा होऊन ५५ रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तो अतिगंभीर व व्हेंटिलेटर वर होता. करोनाच्या गंभीर रुग्ण अतिगंभीर होण्याच्या मार्गावर असताना जर रुग्णावर प्लाझ्मा उपचार केले तर त्याचा नक्कीच फायदा होतो असे आढळून आल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले.

करोनातून बरा झालेल्या रुग्णांकडून साधारण तिसर्या आठवड्यानंतर प्लाझ्मा घेता येऊ शकतो जो करोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी वापरला जातो. धारावीमध्ये एकूण २५३१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत व स्थानिक पातळीवर सहाय्यक पालिका आयुक्त तसेच नगरसेवकांकडून बरे झालेल्या करोना रुग्णांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. केईएम, शीव व नायर रुग्णालयातील डॉक्टरांकडून यासाठी संभाव्य दात्यांना प्लाझ्मा दानासाठी मार्गदर्शन केले जात आहे. महापालिका आयुक्त चहल हे प्लाझ्मा दान शिबिरासाठी आग्रही असल्यामुळे पालिकेच्या २४ वॉर्डात करोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले जात आहे. पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात यासाठी चढाओढ सुरु असून आजतरी नायर रुग्णालयाने बाजी मारली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record break plasma donation at nair hospital mumbai scj
First published on: 28-07-2020 at 20:52 IST