मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासनीसांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करून दंड वसुलीचा नवा विक्रम केला आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि उपमुख्य तिकीट निरीक्षक (दादर) मल्लिगा यांनी केलेल्या विक्रमी दंड वसुलीमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत लाखो रुपये महसुलाची भर पडली आहे.

पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, हजारो प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करीत असल्यामुळे त्यांची नोंद होत नाही. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना योग्य सुविधा पुरवण्यात काही वेळा अडचणी येतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. या वातानुकूलित लोकलमधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड करण्यासाठी महिला तिकीट तपासनीसांनाही तैनात करण्यात आले आहे. नयना पटेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागाबाहेरील ४,४७० हून अधिक अनधिकृत प्रवाशांची धरपकड करून सुमारे ३३ लाख रुपये विक्रमी दंड वसूल करण्यात आला. तर, मल्लिगा यांनी विनातिकीट प्रवासाची सुमारे ७,८२० प्रकरणे शोधून २१.५० लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला.

पश्चिम रेल्वेमधील महिलांनी रूढीवादी कल्पना मोडून काढल्या आहेत आणि त्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. नयना पटेल यांनी मोठ्या उत्साहाने स्वतंत्रपणे काम करण्याचा त्यांचा दृढनिश्चय आणि क्षमता दाखवली, त्यामुळे २०२४ मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याचप्रमाणे, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागाचे निरीक्षण करणाऱ्या उपमुख्य तिकीट निरीक्षक (दादर) मल्लिगा यांनी वर्षभरात प्रभावीपणे काम करून दंडवसुली केली. नयना पटेल आणि मल्लिगा इतर महिला कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे इतरांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्य रेल्वेवरील महिला तिकीट तपासनीस आघाडीवर

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून दररोज १,८१० लोकल धावतात. यामधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, मध्य रेल्वेवरून दररोज ६६ वातानुकूलित लोकल धावतात. यामधून दररोज सुमारे ७६,८३६ प्रवासी प्रवास करतात. नुकताच मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनीस रुबिना अकिब इनामदार यांनी एका दिवसात १५० विनातिकीट प्रवाशांना पकडून ४५,७०५ रुपये दंड वसूल करून विक्रमी कामगिरी केली. तर, हा विक्रम झाल्यानंतर अवघ्या चार दिवसातच महिला तिकीट तपासनीस सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात २०२ विनातिकीट प्रवाशांना पकडून ५५,२१० रुपये दंड वसूल केला होता.