संगणकीय प्रणालीतील त्रुटीमुळे करारनामा प्रक्रियेत अडथळा

मुंबई : नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने म्हाडाला ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संगणकीय प्रणालीमधील त्रुटींमुळे बीडीडी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या रहिवाशांच्या नोंदणीकृत करारनाम्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, करारनामा देण्याची प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असून बीडीडी चाळींच्या पुनर्विकासास विलंब होण्याच्या भीतीने म्हाडा अधिकाऱ्यांची चिंता वाढत आहे.

बीडीडी चाळीतील रहिवाशांची पात्रतानिश्चिती करून त्यांना सोडतीद्वारे पुनर्वसित इमारतींमधील घरांची हमी देण्यात येत आहे. सोडतीत सहभागी झालेल्या पात्र रहिवाशांना पुढे नोंदणीकृत करारनामा वितरित करण्यात येऊन नंतर त्यांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई मंडळासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे,  अत्यंत आवश्यक आहे. जानेवारीमध्ये नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून तेथे जानेवारी, फेब्रुवारीत प्रत्यक्ष बांधकामास  सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आता नोंदणीच रखडल्याने फिस्कटले आहे.  दीड महिन्यापासून नोंदणीकृत करारनाम्याची प्रक्रिया रखडल्याने हा परिणाम झाला आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी मुंबई मंडळाला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून संगणकीय प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रणालीत अनेक त्रुटी असून प्रणाली योग्य प्रकारे काम करत नसल्याने नोंदणीकृत करारनामा देण्याची प्रक्रियाच सुरू होऊ शकलेली नाही. या अडचणी दूर करण्यात येत आहेत. मात्र त्यासाठी नेमका किती कालावधी लागेल हे गुलदस्त्यातच आहे. परिणामी, नोंदणीकृत करारनाम्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

दुरुस्तीचे काम सुरू

नोंदणीकृत करारनामा प्रक्रिया संगणकीय प्रणालीतील त्रुटीमुळे रखडली आहे. त्याचा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या पुढील कामावर परिणाम होत आहे. पण संगणकीय प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांच्याकडूनही संगणकीय प्रणालीत आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे.  दुरुस्तीचे काम झाल्यानंतर नोंदणीकृत करारनाम्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हाडाला देण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीत काही अडचणी येत आहेत. त्यामुळे संगणकीय प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक