विशाखापट्टनम वर्गातील (Visakhapatnam class destroyer) तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ ( INS Imphal) आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत इम्फाळ युद्धनौकेवर पहिल्यांदाच नौदलाचा ध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. विशाखापट्टनम वर्गात याआधी आयएनएस विशाखापट्टनम आणि मोरमुगाओ या दोन विनाशिका प्रकारातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत.

कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या भाषणात देव आणि दानव यांचा उल्लेख करत संरक्षण मंत्री म्हणाले की देवांकडे विविध शक्ती जरी असल्या तरी दानवांचा पराभव जवळ होत नव्हता, तेव्हा सर्व शक्ती एकत्र येत महाशक्ती जगदंबा उत्पन्न झाली आणि दानवांचा पराभव झाला. याचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले की संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांनी पूर्ण ताकद लावत एकत्र येणे आवश्यक आहे. यामुळेच भारत महाशक्ती होण्यास मदत होणार आहे. INS Imphal हे त्याचेच एक प्रतिक आहे. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या युद्धनौकेच्या निर्मितीबद्दल संरक्षण मंत्र्यांनी तंत्रज्ञ, अभियंता आणि नौदलाचे अभिनंदन केले. Imphal मुळे इंडो-पॅसिफिक भागात भारतीय नौदलाची ताकद वाढण्यास आणखी मदत होणार आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: “राहुल गांधी भाजपासाठी वरदान”, देवेंद्र फडणवीसांचा टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गेल्या काही दिवसांत भारताच्या दोन मालवाहू जहाजांवर समुद्रात हल्ल्याच्या घटना घडल्या. विशेषतः दोन दिवसांपूर्वी एका जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. याचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले ” गेल्या काही दिवसांत समुद्रात विविध घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या वाढलेल्या नौदलाच्या ताकदीमुळे काहींचा जळफळाट होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या मालवाहू जहाजांवर झालेले हल्ले हे गंभीरपणे घेण्यात आलेले आहेत. समुद्रात नौदलाची गस्त आणखी वाढवण्यात आली आहे. या घटनांमागे जे कोणी असतील ते समुद्राच्या तळाशी जरी असले तरी त्यांना आम्ही शोधून काढू असे आश्वासित करतो. देशाच्या जवळून होणारी जलवाहतूक आणि व्पापार हा मित्र देशांच्या मदतीने आम्ही आणखी सुरक्षित करु”.