मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी रात्री १०च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरातील सभा संपल्यानंतर शहा यांनी मुंबईकडे प्रयाण केले. तत्पुर्वी शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेला २० ते २२ तर राष्ट्रवादीला किमान १० जागांची अपेक्षा आहे. विद्यामान खासदार असलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहतील, असे सर्वसाधारण सूत्र ठरलेले आहे. मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असलेल्या जागा भाजप, शिंदे किंवा अजित पवार गट यापैकी कोणी लढवायच्या, यावरून वाद आहे. त्यावर सह्याद्रीवरील चर्चेत मार्ग निघण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत वाढणार, मुंबई-कोल्हापूर, पुणे-वडोदरा वंदे भारत धावणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. यामागे जागावाटपाचा तिढा असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारच्या बैठकीत तिढा सुटल्यास संसदीय मंडळाच्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिंदे व पवार गटाला देण्यात येणाऱ्या जागांवर कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे, याबाबत भाजपकडून सूचना देण्यात येत असल्याची माहिती आहे.शहा बुधवारी सकाळी अकरा वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इंडियन ग्लोबल फोरमच्या वार्षिक संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.