मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : वांद्रे, कलानगर जंक्शन येथील पश्चिम द्रुतगती मार्गालगत ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या मालकीच्या भूखंडावर असलेल्या ५५६ झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे मुंबईतील अत्यंत मोक्याच्या जागी ‘म्हाडा’ची घरे उपलब्ध होणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मोकळय़ा जागेच्या टंचाईमुळे गृहनिर्मिती मंदावली आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘म्हाडा’च्या मालकीच्या दुर्लक्षित जागांचा शोध सुरू होता. या शोधमोहिमेअंतर्गत कलानगर जंक्शन येथील पश्चिम द्रुतगती मार्गालगत अगदी मोक्याच्या ठिकाणी सेक्टर ७ आणि ८ चा भूखंड सापडला आहे. या भूखंडाचा मोतीलाल नगरच्या धर्तीवर, म्हणजेच खासगी विकासकाच्या माध्यमातून (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी) पुनर्विकास करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढण्यात येतील. मंडळाला विक्री क्षेत्रफळातील अधिक हिस्सा देणारी निविदा अंतिम करून त्या विकासकाला काम दिले जाईल. ५५६ झोपडीधारकांना सदनिका उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित जागेवर विक्रीसाठी घरे बांधली जाणार आहेत, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असून त्यासाठी बराच काळ लागणार आहे. तेथे नेमकी किती अतिरिक्त घरे उपलब्ध होतील, हे निविदा अंतिम झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
व्यावसायिक इमारतीऐवजी सदनिका सेक्टर ७ आणि ८ चा एकूण भूखंड ३१ हजार ६९५ चौ.मी. इतका आहे. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी या भूखंडावर व्यावसायिक इमारती बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याअनुषंगाने अभ्यास सुरु होता. मात्र आता घरांची आवश्यकता लक्षात घेऊन मंडळाने तेथे व्यावसायिक संकुलाऐवजी सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे.