मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जागेवरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात झाली. आतापर्यंत ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले असून विर्लेपार्ले येथील अनधिकृत जाहिरात फलकावर पहिला हातोडा पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मुंबई मंडळाने फलक हटविण्याच्या कामाला काही वेळापूर्वी सुरुवात केली आहे.

घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेनंतर म्हाडाने सर्व विभागीय मंडळांना आपल्या अखत्यारितील भूखंडावरील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले होते. मुंबई मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळले आहेत. हे सर्व फलक वांद्रे विभागात आहेत. म्हाडाच्या भूखंडावर जाहिरात फलक लावण्यासाठी संबंधित म्हाडा विभागीय मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र असेल तरच पालिकेला जाहिरात फलक लावण्यास परवानगी देता येते. असे असताना मंडळाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न घेता महापालिकेच्या परवानगीने म्हाडाच्या भूखंडावर ६० फलक लावण्यात आल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६० अनधिकृत जाहिरात फलक आढळल्यानंतर मुंबई मंडळाने पालिकेला पत्र पाठवून तात्काळ हे जाहिरात फलक हटविण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार अखेर आता अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरवात झाली.

हेही वाचा >>>ऑनलाइन फसवणुकीसाठी बँक खातेधारक जबाबदार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या मदतीने अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यात येणार आहेत. पहिली कारवाई मौजे विलेपार्ले (ता. अंधेरी) येथील भूखंड क्रमांक ३६, विलेपार्ले शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्था येथील अनधिकृत जाहिरात फलकाविरोधात होणार आहे. काही वेळातच फलक हटविण्याच्या कारवाईस सुरुवात होणार आहे. उर्वरित फलक हटविण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.