मुंबई : वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प (ता. सेलू) आणि धाम मध्यम प्रकल्प (ता. आर्वी) या दोन सिंचन प्रकल्पांच्या नुतनीकरणासाठी सुमारे ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
बोर मोठा प्रकल्प वर्धा नदीवर १९६७ मध्ये बांधण्यात आला आहे. बोरी गावाजवळील या धरणाचा साठा १३४.५४२ द.ल.घ.मी असून उपयुक्त पाणी साठा १२३.२१२ द.ल.घ.मी आहे. यामुळे सुमारे १६ हजार १९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचा सेलू व समुद्रपूर तालुक्यातील ७७ गावांना सिंचन लाभ होतो. या प्रकल्पाची २४० किमीची कालवा व वितरण व्यवस्था दीर्घकालीन वापरामुळे तसेच वारंवारच्या अतिवृष्टीमुळे जीर्ण झाली आहे.
प्रकल्पाची विसर्गक्षमता घटली असून पाणीगळतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या वितरण प्रणालीचे नुतनीकरण करणे अत्यावश्यक आहे. या दुरुस्तीअंतर्गत मुख्य कालवा, वितरीका, उपवितरिका, लघुकालवे, तसेच धरणाचे काटछेद, सांडवा, ड्रेन्स व पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधकाम किंवा योग्य दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी २३१ कोटी ६९ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.
धाम मध्यम प्रकल्पासाठी १९७.२७ कोटी मंजूर
धाम प्रकल्पाचे बांधकाम १९८६ मध्ये पूर्ण झाले असून जुने कालवे, वितरिका, लघुकालवे आता जीर्ण अवस्थेत आहेत. गोदावरी खोऱ्यातील वर्धा जिल्ह्यातील महाकाळी गावाजवळील धाम नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून याद्वारे ७ हजार ९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. धरणाची एकूण लांबी १ हजार ६६३ मीटर असून, मुख्य कालवा व उपवितरिका, लघुकालव्यासह वितरण व्यवस्था २३० किमी आहे. या प्रकल्पातून विसर्गक्षमता घटली असून, संरचनांमधून पाणीगळती होऊ लागली आहे.
त्यामुळे धरण, सांडवा, कालवे, बांधकाम संरचना, धरण माथा रस्ता आणि धरणाकडे जाणारा पोहोच रस्ता यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी १९७ कोटी २७ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. ही दोन्ही कामे विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत होणार आहे. या दोन्ही सिंचन प्रकल्पांमुळे विदर्भातील सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.