मुंबई : जेष्ठ लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. मराठी विषयाच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनी वीस वर्षाहून अधिक काळ मुंबईच्या विविध महाविद्यालयातून अध्यापनाचे कार्य केले. कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र आणि समीक्षा आदी साहित्य प्रकारात त्यांनी योगदान दिले. त्यांच्या पश्चात पती मोहन वर्दे, दोन विवाहित कन्या लक्ष्मी लोबो आणि गीतिका वर्दे कुरेशी, तसेच नातवंडे असा परिवार आहे. जगप्रसिद्ध तालवादक तौफिक कुरेशी हे त्यांचे जावई होत.
मोहिनी वर्दे यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सिडनहॅम महाविद्यालयातून अध्यापन कार्याला सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालयात २० वर्षाहून अधिक काळ मराठी विषयाचे अध्यापन केले. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात १८ वर्षे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्वशैली यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होत्या. ‘त्यांनी लिहिलेले डॉ.रखमाबाई एक आर्त’ हे डॉ. रखमाबाई राऊत यांच्या एकोणिसाव्या शतकातील संघर्षमय जीवनावरील चरित्र गाजले. बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित ‘गंधर्व : व्यक्ती आणि कार्य’ हे चरित्र, तसेच ‘अधोरेखित’, ‘अभागी’, ‘पाडीले वळण’, ‘बीजमंत्र’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘किन्नर’, ‘टिझर’ या कादंबऱ्यांचे आणि ‘तनुभाव’, ‘सप्तक’, सारस्वतांचे हुंकार’ या ललित गद्यसंग्रहांचे लेखन त्यांनी केले.
वर्दे यांनी काही वर्षे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ आणि महाराष्ट्र चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सदस्य म्हणूनही काम केले होते. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना केसरी – मराठा पुरस्कार (१९८४), साहित्यसेवा पुरस्कार (१९९८), ललित गौरव पुरस्कार (१९८६) आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी साहित्यिक विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात आली.