मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीवर भरमसाठ खर्च झाल्याचे समोर आले आहे. सोफासाठी २०.४७ लाख रुपये तर स्वयंपाक गृहाच्या दुरुस्तीसाठी १९.५३ लाख, असे एकूण ४० लाखांहून अधिक पैसा खर्च केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर एक संदेश प्रसारित करून भरमसाठ खर्चावर टिका केली आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी दिली जात नाही. राज्यावरील कर्जाचा डोंगर ९.५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा आर्थिक टंचाईच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सोफासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख, असा एकूण ४० लाखांहून अधिक पैसा खर्च केला जात आहे. एकूण दुरुस्तीचा खर्च वेगळाच. याला जनतेच्या पैशाची उथळपट्टी म्हणावे की, वाढलेली महागाई, असा टोलाही पवार यांनी लगाविला आहे.

हा प्रकार असाच चालू राहिला तर ‘रोम जळत आहे आणि निरो पियानो वाजवत आहे.’ असाच त्याचा अर्थ निघेल. मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामे केली पाहिजेत, पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचा ताळमेळ असला पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

वर्षांची दुरुस्ती चर्चेचा विषय

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानातील दुरुस्ती अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. वर्षा निवासस्थानाच्या दुरुस्तीवर प्रचंड पैसे खर्च केला जात आहे. वर्षा निवासस्थानातील विविध गोष्टी जीर्ण झालेल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे अगोदर तिथे राहत असल्यामुळे वर्षा निवास स्थानाची तपासणी करून व होम हवन केल्यानंतरच फडणवीस तिथे राहण्यासाठी जातील, अशी चर्चा होती. मात्र , मुख्यमंत्री यांच्या मुलीची परीक्षा संपल्यानंतर मुख्यमंत्री तिथे राहण्यासाठी गेले आहेत.