मुंबई : राज्य सरकारने गुन्हेगारांना जामीन देण्याची आणि नेत्यांना जमीन देण्याची नवी योजना सुरू केली आहे. राज्यभरात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने जमिनीचे अनेक गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपयांच्या जमिनी लाटल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केला.

आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात राज्य सरकारवर सडकून टिका केली आहे. राज्य सरकारने गुन्हेगारांना जामीन तर नेत्यांना जमीन देण्याची योजना सुरू केली आहे. नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या गटाने ५००० कोटी रुपयांच्या सिडकोच्या जमिनीचा गैरव्यवहार केला.

पुण्यात भाजपने १८०० कोटी रुपयांची जैन बोर्डिंगची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. संभाजीनगरमध्ये शिंदे गटाने एमआयडीसीची राखीव जमीन हडपली. पुण्यात अजित पवार गटाने ३०० कोटी रुपयांची कोरेगाव पार्कमधील जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. अहिल्यानगरमध्ये अजित पवार गट जैन समाजाची जमीन लाटली आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ तीन हजार कोटी रुपयांचा अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा झाला आहे. भाजपने मुंबईत एसआरएच्या हजारो कोटींच्या जमिनी लाटल्या आहेत.

शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित गट) या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे, नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी आणि गुन्हेगारांना जामीन देणारी, नवी योजना सरकारने सुरू केली आहे. मत चोरी करून सत्तेवर आलेल्या सरकार जमिनीची लुटमार सुरू आहे, असा आरोपही पवार यांनी केला आहे.

भाजपशी संबंधित प्रकरणे आली की, चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि आपल्या दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की, राजकीय साटेलोटे करायचे. चौकशीचा बनाव करायचा. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट, अशी भाजपची कार्यपद्धती आहे. राज्यात सुरू असलेल्या सर्व गैरप्रकारांना मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी टिकाही पवार यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनाही राजकारणातून संपविले जाईल

भाजपला मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांची गरज आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की, त्यांना टार्गेट केले जाईल. त्यांना राजकारणातून संपविले जाईल. ठाणे शहराच्या राजकारणावर असलेले त्यांचे वर्चस्व ही मोडून काढले जाईल, अशी टिकाही रोहित पवार यांनी केली.

सुप्रिया सुळेंची भावनिक भूमिका

पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याबाबत भाऊ, आजोबा, आत्या म्हणून वेगळी आणि राजकीय विरोधक म्हणून वेगळी भूमिका आहे. सुप्रिया सुळे यांनी पार्थ बाबत पहिल्यांदा मांडलेली भूमिका भावनिक होती. त्यानंतर त्यांनी राजकीय विरोधक म्हणून भूमिका मांडली आहे, तशीच भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. या प्रकरणी सरकारने वेगाने कारवाईचा निर्णय घेतला. पण, सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणात कारवाई केली जात नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.