मुंबई : देशाचा सांस्कृतिक पाया मजबूत करण्यासाठी प्राचीन ज्ञानाचा प्रसार आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.
गीतार्थ गंगा संस्थेतर्फे अरिहंत मालेतील ‘आर्य युग कोश’ चे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते घाटकोपर येथे करण्यात आले. यावेळी आचार्य युगपुरूष सूरजी महाराज, नालंदा विद्यापीठातील डॉ. सूचित चतुर्वेदी यांच्यासह विविध उद्योगसमूहांचे प्रमुख उपस्थित होते. अहमहाबाद येथील गीतार्थ गंगातर्फे देशातील प्राचीन व ऐतिहासिक वारसा जतनाचे काम गेली ३२ वर्षे करण्यात येत आहे. या कोशामध्ये १०८ विषयांवर सुमारे १५०० उपविभाग आहेत.
ज्ञानाचा प्रसार व जतन ही राष्ट्रसेवा आहे, असे आपल्या पूर्वजांनी पाच हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. या कोशातील अमूल्य ठेवा विदेशी मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी महत्वाचा आहे, असे भागवत यांनी सांगितले. ब्रिटीश देशातून जावून ८० वर्षे उलटली, पण अद्याप त्यांच्या विचारांचा पगडा कायम असून तो गेला पाहिजे, असे सूरजी महाराज यांनी नमूद केले. गीतार्थ गंगा या संस्थेच्या वतीने प्राचीन तत्त्वज्ञान आणि ‘एक जग- एक कुटुंब’या भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार या विषयावर १६ ते २२ जानेवारी या काळात ‘वसुधैव कुटुंब की ओर’ ही परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.
