मुंबई : मुंबई साहित्य संघाची निवडणूक ही संस्थेची अंतर्गत निवडणूक असून याबाबत जाहीर चर्चा आणि तक्रारी करणे अयोग्य आहे. यामुळे साहित्य संघासारख्या प्रतिष्ठित संस्थेची विनाकारण बदनामी होत आहे, असे मत ‘ऊर्जा पॅनल’च्या उमेदवार उषा तांबे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
डॉ. भालेराव विचार मंचाकडून मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत साहित्य संघाच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ऊर्जा पॅनलने ४०० मतांची मतचोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर ऊर्जा पॅनलने आपली भूमिका मांडली आहे. पोस्टाने स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट यांचे एकत्रीकरण केल्याने स्पीड पोस्टने पाठविलेल्या मतपत्रिका पोहोचण्यास उशीर झाला, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच सध्याचे नियामक व कार्यकारी मंडळ २०१३ साली निवडून आले असून २०१८ साली हेच मंडळ बिनविरोध निवडून आले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय साहित्य संघाकडे आल्यामुळे कार्यकारी मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्ष निवडणूका झाल्या नाहीत हे म्हणणे योग्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच मतदारांच्या घरोघरी जाऊन माहिती मिळविण्याचे अधिकार नसतानाही डॉ.भालेराव विचार मंचाकडून साहित्य संघाकडून आल्याचे सांगून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेतली जात आहे, अशा तक्रारीही निवडणूक अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.