Saif Ali Khan Stabbing Case : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या मुंबईतील घरात एका दरोडेखोराने १६ जानेवारी रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. शस्त्रक्रियेनंतर त्याला ५ दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी गेल्या १५ दिवसंपासून मोठी चर्चा सुरू असून, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत आता मोठी अपडेट दिली आहे.

गरज पडली तर पोलीस…

सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणावर बोलतना शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैफ अली खान प्रकरणाबद्दल आधीच माहिती दिली आहे. पोलीस सर्व पुरावे गोळा करतील आणि गरज पडल्यास ते अधिकृत पत्रक जारी करतील. त्यांनी दिलेली सर्व माहिती रेकॉर्डवर घेतली जाईल. आम्ही प्रसार माध्यमे आणि पत्रकारांना विनंती करतो की, त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित होणारी चुकीची माहिती पसरवणे थांबवावे आणि पोलिसांना चौकशी पूर्ण करू द्यावी.”

आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी महत्वाचे पुरावे लागले आहेत. यासंदर्भातील माहिती मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे. नुकतेच अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेत सैफ अली खान हल्ला प्रकरणाबाबत आरोपीची ओळख परेड, आरोपीच्या फिंगर प्रिंटबाबत माहिती देत, आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ जानेवारीला सैफवर हल्ला

दरम्यान १६ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजता शरीफुल इस्लाम शहजाद हा हल्लेखोर दरोड्याच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. त्यावेळी घरातील मदतनीसने त्याला अडवले, त्यानंतर त्याने तिच्याशी वाद घातला. हा आवाज ऐकून सैफ तिथे पोहोचला आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने सैफवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यात त्याच्या हाताला व मणक्याला सहा जखमा झाल्या होत्या.