मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर तोडगा निघाल्याचं दिसतंय. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात आज २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी करार करण्यात आला. या करारातील तरतूदी सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास जाणाऱ्या असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ ते १२ हजारांची वाढ होणं अपेक्षित असल्याचं कामगार सेनेने म्हटलंय. मात्र शशांक राव यांच्या बेस्ट कामगार कृती समितीने या करारानुसार कर्मचाऱ्यांना तुटपूंजी पगारवाढ मिळणार असल्याचं सांगत गणेशोत्सवानंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात पगारवाढीच्या मुद्द्यावर बुधवारी चर्चा झाली. या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या वेतन करारासाठी मुंबई महानगरपालिकेने ७८० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदरी केवळ ८ ते १० टक्के पगारवाढ मिळणार असल्याचं म्हणत, बेस्ट कामगार कृती समितीने या कराराला नकार दर्शवला होता.

कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कृती समितीने आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारपासून बेस्ट कामगार कृती समितीचे प्रमुख शशांक राव उपोषण आंदोलन करत आहेत. या उपोषणादरम्यान शशांक राव यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.