मुंबई : जुलैपासून सर्व खासगी अंशत: अनुदानित शाळांना टप्पा वाढ करण्यात येईल. ही वाढ शिक्षकांना ऑगस्टच्या वेतनामध्ये मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आझाद मैदानात एकवटलेल्या हजारो शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जवळपास ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळांना टप्पा अनुदान मिळावे यासाठी या शाळांमधील जवळपास २५ हजार शिक्षकांनी दोन दिवस आझाद मैदानावर ठाण मांडले होते. त्या आंदोलनाची दखल घेत अखेर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन मागण्या मान्य केल्या.

राज्यातील ५ हजार ८४४ खासगी अंशत: अनुदानित शाळांना ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे टप्पा अनुदान लागू करण्यात यावे. यासाठी शिक्षक समन्वय संघामार्फत आझाद मैदानामध्ये ५ जूनपासून आंदोलन पुकारण्यात आले होते. अंशत: अनुदानित शाळांमधील २५ हजार शिक्षक शाळा बंद ठेवून दोन दिवस आझाद मैदानात एकवटले होते. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी दिलेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.

आमची टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या मागणीचा शासन निर्णय निघाल्याने आता फक्त शासनाने अनुदानाचा निधी वर्ग करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार जुलै महिन्याचा टप्पा ऑगस्ट महिन्यात वर्ग करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे शिक्षक समन्वयक संघाचे अध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले.

आंदोलनाला राजकीय बळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पदवीधर मतदारसंघांतील काही आमदारांनी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राेहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळपासून आझाद मैदानात आंदोलकांसह ठाण मांडला. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय बळ मिळाले होते. बुधवारी सकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने मैदानात चिखल झाला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी १ वाजता त्यांना चर्चेसाठी बोलवले. पण नंतर त्यांनी सायंकाळी ५ वाजताची वेळ बैठकीसाठी दिली. या बैठकीदरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांनी आझाद मैदानात घालवली रात्र

शिक्षकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राजकीय पक्षांकडूनही त्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला होता. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राेहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत मैदानात ठाण मांडले होते. त्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून ते पुन्हा आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यानंतर ते अखेरपर्यंत आझाद मैदानामधून हटले नाहीत.