लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान सोमवारी रात्री शहापूर येथे झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. या अपघातानंतर आता अपघातस्थळी अत्याधुनिक अशा स्वयंचलित क्रेनचा (सेगमेंट लॉंचर) सांगडा आणि मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. हे काम किमान १५ दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा २.२८ किमी लांबीच्या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. परिणामी, या पुलाच्या पूर्णत्वास आता एक-दीड महिना विलंब होणार आहे. पण त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वास विलंब होणार नाही. मे २०२४ मध्ये मुंबई – नागपूरदरम्यान ७०१ किमी लांबीचा संपूर्ण महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहापूर येथील सरलांबे (खुटाडी) येथे सोमवारी रात्री साडेअकरा वाजता भातसा नदीवरून पुढे जाणाऱ्या २.२८ किमी लाबीच्या पुलावरील ९८ वा गर्डर (तुळई) बसविताना अपघात झाला. सिंगापूर येथून आणलेल्या अत्याधुनिक अशा क्रेनच्या सहाय्याने ७०० मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसविण्यासाठी पूर्वतयारी सुरू होती. त्याच वेळी गर्डरसह १२५० मेट्रिक टनाची क्रेन कोसळली. यात २० कामगार ठार, तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आता क्रेनचा सांगडा आणि मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम १६ दिवसांत पूर्ण होईल आणि त्यानंतर पुन्हा पुलाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा २.२८ किमी लांबीचा पूल ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. पण आता मात्र हा पुलाच्या पूर्णत्वास एक ते दीड महिन्यांचा विलंब होणार आहे. हा पूल आता डिसेंबरअखेरीस पूल पूर्ण होईल. हा पूल महामार्गावरील चौथ्या टप्प्यातील इगतपुरी – आमणेदरम्यानचा आहे. मात्र याचा महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या पूर्णत्वास विलंब होणार नाही. मे २०२४ मध्ये हा टप्पा आणि पर्यायाने संपूर्ण ७०१ किमी लांबीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले.
नवयुग कंपनीने या पुलाच्या कामासाठी सिंगापूर येथून २५ कोटी रुपयांच्या दोन अत्याधुनिक क्रेन आणल्या होत्या. तर चेन्नईतील व्हीएसएल कंपनी ही स्वयंचलित क्रेन हाताळण्यासह गर्डर बसविण्याचे काम करीत आहे. यापैकी एका क्रेनच्या सहाय्याने ५७ गर्डर बसविण्यात आले आहेत. तर अपघातग्रस्त झालेल्या दुसऱ्या क्रेनने ४१ गर्डर यशस्वीपणे बसविले आहेत. मात्र ४२ वा गर्डर बसविण्याची तयारी सुरू असताना क्रेन कोसळली. आता सध्या वापरात नसलेल्या पहिल्या क्रेनच्या सहाय्याने पुढील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.